मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि करणी सेनेचे कार्यकर्ते कंगनाला संरक्षण देण्यासाठी विमानतळ परिसरात दाखल झाले होते. त्यामुळे विमानतळ परिसरात तणावाचे वातावरण होते.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हातात कंगनाच्या निषेधाचे फलक घेत तिच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘कंगना चले जाव’, ‘कंगनाला मुंबईत फिरकू देणार नाही’ अशा घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून गेला. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या या वेळी मोठ्या संख्येने हजर होत्या. दुसरीकडे आरपीआय आणि करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगनाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या. करणी सेनेचे कार्यकर्ते कंगनासाठी हातात स्वागताचे फलक घेऊन उभे होते.
कंगनाने मुंबईच्या विरोधात जे वक्तव्य केले त्याला आमचे समर्थन नाही. मात्र ती एक महिला असल्याने तिला संरक्षण देणे आम्हाला गरजेचे वाटत असल्याचे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तर, महिलांच्या संरक्षणासाठी करणी सेना नेहमीच रस्त्यावर उतरली आहे. मुंबईत शिवसेनेची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही, असे म्हणत करणी सेनेचे कार्यकर्ते कंगनाच्या बाजूने उभे राहिले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असताना बाचाबाची झाली. काही काळ विमानतळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मागच्या गेटने काढले बाहेर
कंगनाला केंद्र सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातही कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. सीआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आले होते. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी कंगनाला विमानतळाच्या मागच्या गेटने विमानतळाबाहेर बाहेर नेले व तेथून ती तिच्या पाली हिल येथील घराकडे रवाना झाली.