हनुमान चालिसा पठण प्रकरण; नवनीत राणा सुनावणीस पुन्हा गैरहजर, पती रवी राणा मात्र उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 01:49 PM2024-06-13T13:49:37+5:302024-06-13T13:49:53+5:30
Navneet Rana News: तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणाच्या सुनावणीसाठी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा बुधवारी न्यायालयापुढे पुन्हा गैरहजर राहिल्या.
मुंबई - तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणाच्या सुनावणीसाठी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा बुधवारी न्यायालयापुढे पुन्हा गैरहजर राहिल्या. त्या आजारी असल्याने सुनावणीस प्रत्यक्ष हजर राहू शकत नसल्याचे त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले.
हे प्रकरण २०२२ मधील आहे. त्यात माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांचे पती आमदार रवी राणा हेही सहआरोपी आहेत. राणा दाम्पत्यावर भारतीय दंड संहितेतील कलम ३५३ नुसार (हल्ला वा सरकारी सेवकाला त्याचे कर्तव्य निभावण्यापासून बळजबरीने रोखणे) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीशांपुढे सुरू आहे.
या दाम्पत्याने तत्कालीन मुख्यमंत्री आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर जाहीरपणे हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्या खार येथील निवासस्थानी गेले होते. त्यावेळी पाेलिसांच्या कर्तव्यात राणा यांनी अडथळा आणून त्यांना प्रतिकार केल्याचा आरोप आहे. राणा दाम्पत्याची गुन्हा रद्द करण्याबाबतची याचिका उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२३ मध्ये फेटाळली होती. याचिका फेटाळताना, साक्षीदारांच्या जबाबानुसार आरोपींविरोधात प्रथमदर्शनी पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
दरम्यान, भाजपच्या नेत्या असलेल्या नवनीत राणा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून पराभूत झाल्या. काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला.
पुन्हा तारीख
राणा दाम्पत्य न्यायालयापुढे हजर राहण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्याविरोधातील खटल्याचे कामकाज पुढे सरकत नव्हते.
आमदार-खासदारांविरोधातील खटल्यांची सुनावणी घेणारे विशेष न्यायाधीश आर. के. रोकडे यांनी, राणा यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
तथापि, फक्त आमदार रवी राणाच उपस्थित राहिले.
नवनीत राणा यांचे वकील शबीर शोरा यांनी, राणा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या सुनावणीला हजर राहू शकत नसल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने सुनावणी २ जुलैपर्यंत स्थगित केली.