Join us

स्वयंसेवी संस्थांच्या शिक्षकांची होणार चारित्र्य पडताळणी, पालिका शिक्षण विभागाच्या सहआयुक्तांचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 1:25 AM

पालिकेच्या शाळांमध्ये विविध सेवाभावी संस्था आपल्या सेवा देण्यासाठी पालिका शिक्षण विभागासोबत सामंजस्य करार करीत असतात.

मुंबई : विक्रोळीच्या पालिका शाळेत पीटी शिक्षकाकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पालिकेच्या शिक्षण विभागाने सावध भूमिका घेतली आहे. पालिकेसोबत काम करीत असलेल्या सर्व अशासकीय सेवाभावी संस्थांना त्यांच्या शिक्षकांच्या चारित्र्याचे प्रमाणपत्र लवकर सादर करण्याच्या सूचना महापलिका शिक्षण विभागाचे सहआयुक्त गंगाधरन डी. यांनी दिल्या आहेत. 

पालिकेच्या शाळांमध्ये विविध सेवाभावी संस्था आपल्या सेवा देण्यासाठी पालिका शिक्षण विभागासोबत सामंजस्य करार करीत असतात. आतापर्यंत जवळपास १५ सेवाभावी संस्था स्वयंसेवकांच्या, शिक्षकांच्या साहाय्याने आपल्या सेवा पालिका शाळांना पुरवीत आहेत. या संस्थांचे स्वयंसेवक विद्यार्थ्यांना आरोग्य, शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्र व विषयांतील शिक्षण देत असतात. अनेक स्वयंसेवक विद्यार्थ्यांना मानसिक तणाव व्यवस्थापन, समुपदेशन यांमध्ये ही मदत करीत आहेत. त्यामुळे या शिक्षकांनी ही कागदपत्रे सादर केल्याशिवाय आता त्यांना शाळा परिसरातही जाता येणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

स्वयंसेवी संस्थांची मदत कशाला? स्वयंसेवी संस्थांनी याला विरोध केला असून, नाराजी दर्शवली आहे. यामुळे पालिका शिक्षण विभागात शिक्षकांची रिक्त पदे भरली गेल्यास स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी किंवा शिक्षकांची आवश्यकताच काय, असा सवाल उपस्थित केला आहे. पालिका शिक्षण विभागाने त्यांना मिळणारा निधी आणि शिक्षक पदे यांचे योग्य नियोजन केल्यास स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचीही गरज लागणार नाही, अशी प्रतिक्रिया काही शिक्षक करीत आहेत. 

शिक्षक म्हणजे दुसरे पालकच असतात. त्यामुळे मोठ्या विश्वासाने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत असतात; परंतु अशा घडणाऱ्या घटनांमुळे पालक व्यथित होतात व व्यवस्थेवरचा विशेषतः पालिका शाळांवरचा विश्वास उडू शकतो. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाकडून घेतलेला निर्णय योग्य असून, पालकांना विश्वास व दिलासा देणारा आहे. यात सगळ्यांनी जबाबदारीने वागणे महत्त्वाचे वाटते.- सुशील शेजुळे, समन्वयक, आम्ही शिक्षक संघटना

टॅग्स :मुंबई महानगरपालिका