खासगी सुरक्षारक्षकांची होणार सीसीटीएनएसमार्फत चरित्र पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 01:53 AM2020-12-18T01:53:38+5:302020-12-18T01:53:43+5:30
हेलपाटे थांबणार : ‘एसएआय’ने मानले केंद्रीय गृहमंत्रालयाचे आभार
n गौरी टेंबकर - कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी सुरक्षारक्षकांच्या चरित्र पडताळणीसाठी आता क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क ॲण्ड सिस्टम (CCTNS) प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आता खासगी सुरक्षा कंपन्यांना एखाद्या कर्मचाऱ्याला नियुक्त करताना वारंवार स्थानिक पोलीस ठाण्यात हेलपाटे घालणे बंद होणार असून, अशा पाच मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. यासाठी सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसएआयने (SAI) केंद्रीय गृहमंत्रालयाचे आभार मानले.
खासगी सुरक्षा व्यवसायात काही सुधारणा करण्यात येण्याची मागणी एसएआयकडून करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत काही सूचनाही सुचविण्यात आल्या होत्या. त्यानुसार केंद्र सरकारने याची दखल घेत खासगी सुरक्षा एजन्सी नियम २००६ मध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार आता खासगी सुरक्षारक्षक म्हणून एखाद्याची चरित्र पडताळणी करायची असेल तर ती क्राइम ॲण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क ॲण्ड सिस्टम - सीसीटीएनएस (CCTNS) पोर्टलमार्फत केली जाईल. त्यामुळे संबंधित व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याची माहिती लगेच तपास यंत्रणांना मिळेल.
याच सोबत व्हेरिफिकेशन अवधी हा ३ वर्षांवरून ५ वर्षे करण्यात आला आहे. एखाद्या एजन्सीने परवाना संपुष्टात येण्यापूर्वी नूतनीकरण अर्ज सादर केला मात्र परवाना नूतनीकरण झाला नाही किंवा त्यासाठी काही कालावधी आणखी लागणार असल्यास तोपर्यंत संबंधित परवाना वैध मानला जाईल. यापूर्वी एखाद्या व्यक्तीच्या नावे सुरक्षा एजन्सी परवाना दिला जात होता मात्र आता तो कंपनीच्या नावे दिला जाणार आहे. पूर्वी एखाद्या राज्यात सुरक्षारक्षक म्हणून रुजू व्हायचे असल्यास २१ दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यावर प्रमाणपत्र मिळायचे मात्र ते दुसऱ्या राज्यात ग्राह्य धरले जात नसल्याने पुन्हा संबंधित व्यक्तीला प्रशिक्षण घ्यावे लागत हाेते. मात्र आता कोणत्याही राज्याचे प्रमाणपत्र संपादन केले की त्याला देशभर मान्यता दिली जाणार असल्याने याचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने केलेल्या या सकारात्मक बदलांमुळे खासगी सुरक्षायंत्रणेला अधिकाधिक बळकटी मिळण्यास मदत होईल. तसेच माझे सहकारी आणि एसएआयचे उपाध्यक्ष डॉ. बी. आर. कुमार अगरवाल यांनीही वयाची तमा न बाळगता सुरक्षारक्षकांच्या कल्याणासाठी स्वतः दिल्लीपर्यंत माझी साथ दिली त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो.
- गुरुचरणसिंग चौहान,
अध्यक्ष, सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (SAI)