प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत पदयात्रांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:08 AM2021-02-06T04:08:09+5:302021-02-06T04:08:09+5:30
मुंबई : माझी मुंबई माझी काँग्रेस या उपक्रमांतर्गत मुंबई काँग्रेसकडून मुंबईतील शंभर वाॅर्डांमध्ये पदयात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार, ...
मुंबई : माझी मुंबई माझी काँग्रेस या उपक्रमांतर्गत मुंबई काँग्रेसकडून मुंबईतील शंभर वाॅर्डांमध्ये पदयात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार, ६ फेब्रुवारीला काँग्रेस प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत सायन विभागातून पदयात्रांना सुरुवात होणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.
आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जगताप यांनी उपक्रमाची माहिती दिली. ''माझी मुंबई माझी काँग्रेस - १०० दिवस १०० वार्ड'' या उपक्रमांतर्गत शनिवारी सायंकाळी सायन विभागातून ''पदयात्रेला'' सुरुवात होणार आहे. मनपा विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्या सायन विभागातील प्रतीक्षा नगर येथील गणेश चौक येथून सुरू होऊन सायन आणि अँटॉप हिल भागातील ५ ते ६ वार्डात पदयात्रा जाणार आहे. त्यानंतर संगम नगर येथे पदयात्रेचे रुपांतर जाहीर सभेत होणार आहे. आम्ही संपूर्ण मुंबईतील २२७ वार्डात पदयात्रा काढणार आहोत. प्रत्येक वेळी एका मतदार संघातील ५ ते ६ वार्डमध्ये पदयात्रा जाणार आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढ, घरगुती गॅस दरवाढ, महागाई, झोपडपट्टीधारकांना मोफत पाणी, मालमत्ता कर माफ, एसआरए आणि पुनर्विकास प्रकल्पांमध्ये ५०० फुटाचे घर अशा सर्व गोष्टी पदयात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत तसेच त्यांच्या स्थानिक समस्या व अडचणी समजून घेणार आहोत, असेही जगताप यांनी सांगितले.