शरजिल उस्मानीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:36 AM2021-02-05T04:36:33+5:302021-02-05T04:36:33+5:30
आमदाराकडून दिंडोशी पोलिसात लेखी तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू धर्माच्या भावना दुखावतील असे वक्तव्य ...
आमदाराकडून दिंडोशी पोलिसात लेखी तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू धर्माच्या भावना दुखावतील असे वक्तव्य शरजिल उस्मानी या विद्यार्थ्यांने केले. त्यानुसार त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्याची मागणी भाजपच्या आमदाराने करत मंगळवारी याबाबत दिंडोशी पोलिसांना लेखी पत्र दिले आहे.
पुणे येथे ३० जानेवारी, २०२१ रोजी आयोजित एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने ‘हिंदू समाज सडलेला आहे’ असे वक्तव्य करून तमाम हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचे व समाजात तेढ निर्माण करण्याचे दुष्कृत्य केले. उस्मानी याचे हे वक्तव्य पूर्णपणे देशविघातक असून त्यांच्या विरोधात सामाजिक भावना दुखावण्यासह देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडोशी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. २०१७ साली एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगाव येथे मोठी दंगल झाली व संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. याची कल्पना असतानासुद्धा या वर्षी पुन्हा एल्गार परिषदेला परवानगी देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने दिंडोशी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. भातखळकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सुपूर्द केली असून याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.