Join us

तंत्रशिक्षण विभागातील प्रभारीराज हटेना, संचालकांची नियुक्ती रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 4:58 AM

राम शिनगारे औरंगाबाद : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रशासकीय सेवा प्रभारींच्या हाती एकवटल्याची स्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद ...

राम शिनगारे औरंगाबाद : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रशासकीय सेवा प्रभारींच्या हाती एकवटल्याची स्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद ‘मॅट’च्या न्यायालयाने संचालकांसह दोन सहसंचालकांची नियुक्ती रद्द करण्याचा आदेश नुकताच दिला आहे. त्यामुळे सहसंचालकांची १० पैकी ७, उपसंचालकांची ५ पैकी ४ आणि सहायक संचालकांची १६ पैकी १५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर वर्षानुवर्षे प्रभारींची मक्तेदारी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

तंत्रशिक्षण विभागातील शेकडो प्राध्यापकांना १५ वर्षांपासून एकही पदोन्नती मिळालेली नसल्यामुळे असंतोष आहे. न्यायालयाने निवड रद्द केलेले संचालक डॉ. अभय वाघ हे सहायक संचालकपदावर २००३ मध्ये नियुक्त झाले. तेव्हापासून त्यांनी मुंबईतच विविध पदे भूषविली. २००८-१५ या कालावधीत प्रभारी संचालकपद भूषविलेले महाजन हेसुद्धा मुंबईतच कार्यरत आहेत. नागपूर येथील सहसंचालक जी. आर. ठाकरे हे १५ वर्षांपासून नागपूर येथील कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या उपसंचालकपदाच्या पदोन्नतीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता नसतानाही त्यांना उपसंचालक, सहसंचालकपदावर पदोन्नती दिली असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील सहसंचालक पी. ए. नाईक व व्ही. एम. मोहितकर हे सहायक संचालकपदावर २००४ साली नियुक्त झाले. तेव्हापासून सहसंचालकपदावर निवड झाली तरी त्यांनी मुंबई सोडली नाही. उपसंचालक एस. पी. यावलकर हेसुद्धा २०१० पासून मुंबईतच कार्यरत आहेत. १६ सहायक संचालकांच्या पदापैकी एकमेव असलेले डॉ. महेश शिवणकर हे काही वर्ष राजस्थानमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. डॉ. शिवणकर हे सहायक संचालक असताना त्यांच्याकडे २०१२ पासून थेट औरंगाबाद विभागाच्या सहसंचालकपदाचा पदभार देण्यात आलेला आहे. औरंगाबादच्या तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. एस. ए. खान हे १९९५ पासून प्राचार्यपदी कार्यरत आहेत. त्यांची सेवा ज्येष्ठता असतानाही त्यांचा गोपनीय अहवाल कनिष्ठ असलेले डॉ. शिवणकर लिहितात, अशी अवस्था असल्याची माहिती तक्रारकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

पुणे, नाशिक येथील सहसंचालकपदाचा पदभार प्राचार्यांकडे सोपविण्यात आलेला आहे. मात्र औरंगाबादेत सहायक संचालकांनाच सात वर्षांपासून सहसंचालक बनविण्यात आले आहे.कार्यक्षेत्र वाटून घेतल्यामुळे मुस्कटदाबीमंत्रालयापासून तंत्रशिक्षण संचालक, सहसंचालक कार्यालयामध्ये वर्षानुवर्षे एकच व्यक्ती पदावर असल्यामुळे त्यांच्याविरोधात तंत्रनिकेतन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आवाज उठवत नाहीत.कोणी आवाज उठवला तर अडचणीच्या ठिकाणी बदल्या करण्याची, गोपनीय अहवाल चुकीचा लिहिण्याची भीती प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना असल्याचेही एका प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :राज्य सरकार