मुंबई : अँकर अर्पिता तिवारी हिच्या हत्येप्रकरणी मालवणी पोलिसांनी मित्र अमित हाजरा याला सोमवारी अटक केली आहे. या रहस्यमयी मृत्यूप्रकरणी काही संशयितांची ‘पॉलिग्राफिक टेस्ट’ करण्यात आली होती. हाजराने पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबात आणि चाचणीदरम्यान दिलेल्या माहितीत तफावत आढळली. तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हाजरावर कारवाई करण्यात आली. त्याच्या चौकशीतून आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.मालवणीतील ‘मानवस्थल’ इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर अर्पिता ही गेल्या पाच वर्षांपासून प्रियकर पंकज जाधव आणि हाजरासोबत राहायची. तिघेही भाडेतत्त्वावर या फ्लॅटमध्ये राहत होते. अर्पिता आणि पंकजप्रमाणे हाजरा हादेखील इव्हेंटमध्येच काम करायचा. ११ डिसेंबर, २०१७ रोजी जेव्हा अर्पिताचा अर्धनग्नावस्थेतील मृतदेह इमारतीत सापडला तेव्हा पोलिसांनी पंकज आणि हाजरासह अन्य काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांचे जबाब नोंदविले होते. मात्र सर्वतोपरी चौकशी करूनदेखील पोलिसांच्या हाती काहीच धागेदारे लागत नव्हते.पोलिसांनी मुख्य संशयित पंकज आणि हाजरा यांची मानसशास्त्रीय चाचणी (पॉलिग्राफिक टेस्ट) केली. यात हाजराने पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबात आणि चाचणीदरम्यान दिलेल्या माहितीत बरीच तफावत आढळली. त्यावरून त्यानेच अर्पिताची हत्या केल्याचे उघड झाल्याचे एका वरिष्ठ तपास अधिकाºयाने सांगितले. हाजराला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पंकज बेरोजगार होता. अर्पिताच्याच पैशांवर तो अवलंबून होता. आठ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतरही पंकज तिच्याशी लग्न करायला तयार होत नव्हता, त्यामुळे ती तणावात होती, असे तिच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितले. पंकज हा अर्पितासोबतचे संबंध कायमचे तोडण्याच्या विचारात असल्याचे हाजराला माहीत झाले होते. त्याचे अर्पितावर एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे तो सतत तिचे लक्ष स्वत:कडे वळविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अर्पिता त्याला थोडाही भाव देत नव्हती. त्याच रागातून त्याने तिची हत्या केल्याचा संशय वर्तविला जात आहे.
अर्पिता हत्येप्रकरणी मित्राला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 4:49 AM