मुंबई : आपल्या लेटरहेडवर खोट्या सह्या घेऊन महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा चिटणीस कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचा आरोप ‘मनसे’ शिवसैनिक असलेल्या नगरसेविका गीता चव्हाण यांनी आज करून खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी त्यांनी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. परंतु त्यांचा आरोप मनसेने फेटाळून लावला आहे.सांताक्रुझ येथील ९२ क्रमांकाच्या प्रभागातून मनसेच्या तिकिटावर गीता चव्हाण २०१२मध्ये निवडून आल्या होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांत त्या पक्षविरोधी कारवाई करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर मनसेकडून होऊ लागला. या प्रकरणी त्यांची पक्षांतर्गत चौकशीही सुरू होती. प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाविरोधात मतदान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (प्रतिनिधी)२९ आॅगस्टला महिला व बालकल्याण समिती सदस्यपदाचा राजीनामा मनसेने चिटणीस खात्याकडे सादर केला. सभागृहात त्यांचे सदस्यत्व रद्द केले. मात्र आपल्या लेटरहेडवर खोट्या सह्या घेऊन हा राजीनामा सादर केल्याची तक्रार आझाद मैदान पोलीस ठाण्यात केली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हा राजीनामा ३० आॅगस्टला मंजूर झाला. त्यानंतर समितीची एक बैठक झाली. दोन महिन्यांनी चव्हाण यांना जाग आली काय? हस्ताक्षर तज्ज्ञांकडून चौकशी करावी, अशी भूमिका मनसे गटनेते देशपांडे यांनी जाहीर केली.
मनसे नगरसेविकेचा गटनेत्यावरच आरोप
By admin | Published: October 25, 2016 4:34 AM