शिवसेना भवनसमोरील राड्यानंतर माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू जगडे, राकेश देशमुख, शशी पुडने यांचा समावेश असून, माहीम पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.
अंगावर याल तर शिंगावर घेऊ - किशोरी पेडणेकर, महापौर
शिवसेना भवन हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि याला कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर मग आमच्याकडून तसेच जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. ही केवळ एक प्रतिक्रिया आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याची काय गरज आहे? उगाचच कळ काढली तर त्याला चोख उत्तर दिले जाईल, हे लक्षात ठेवा. आमच्या अंगावर याल तर शिंगावर घेऊ.
जशास तसे उत्तर देऊ - भाजप आक्रमक
भाजप युवा मोर्चाने पोलिसांना सूचना देऊन आंदोलन केले होते. मात्र, शिवसैनिकांनी पोलिसांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली. या घटनेतून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे, असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले. ज्यावेळी सोनिया आणि वाड्रा देव होतात, त्यावेळी साठे, तेंडुलकर, आंबेकर हे आपोआपच शिवसेनेला शत्रू वाटू लागतात. लातों के भूत बातोंसे नही मानते, यापुढे शिवसेनेला लाथांनीच उत्तर मिळेल. पोलिसांनी निष्पक्षपणे काम करावे, अशी आमची अपेक्षा आहे. पण, राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे, हे कळायला मार्ग नाही, असे शेलार म्हणाले.