चार जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

By admin | Published: October 17, 2015 02:37 AM2015-10-17T02:37:01+5:302015-10-17T02:37:01+5:30

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील चार आरोपींविरुद्ध येथील सत्र न्यायालयात सीआयडीतर्फे ३१०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Chargesheet filed against four people | चार जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

चार जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Next

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील चार आरोपींविरुद्ध येथील सत्र न्यायालयात सीआयडीतर्फे ३१०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपपत्रासोबत भ्रष्टाचाराचे अनेक भक्कम पुरावे सीआयडीने सादर केल्याचे समजते. या महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणांचा ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोहोळ; जि. सोलापूर येथील आमदार रमेश कदम याच्या दोन चुलत बहिणींचा आरोपपत्र दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. नकुसा कदम आणि लक्ष्मी लोखंडे अशी त्यांची नावे असून, अन्य दोन आरोपींमध्ये कदमचा सहकारी विजय कसबे आणि महामंडळातील एक कर्मचारी हर्षदा बेंद्रे यांचा समावेश आहे.
या आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४११, ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४७१, १०९, १२० (ब), ३४, १३ (१) (सी) (डी) अन्वये आधीच वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. महामंडळाच्या निधीचा अपहार करणे, अपहारित रक्कम असल्याचे माहिती असूनही ती स्वत:कडे ठेवणे, खोटे दस्तावेज तयार करणे, नियमबाह्य कामे करणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवले आहेत. मोहोळ तालुक्यातील महालक्ष्मी सहकारी दूध डेअरीची बनावट कागदपत्रे तयार करून नकुसा कदमला अध्यक्ष बनविण्यात आले. या डेअरीला ५.३३ कोटी रुपये महामंडळाडून देण्यात आले. पुढे त्यातील ५ कोटी रुपये कुमराल कंपनीकडे वळविण्यात आले. पैठण; जि. औरंगाबादमधील अण्णाभाऊ साठे सहकारी सूतगिरणीला ६० कोटी रुपये महामंडळाकडून देण्यात आले. त्यातील पैसा मुंबईच्या पेडर रोडवर भूखंड खरेदी करण्यासाठी वळविण्यात आला.
रमेश कदमचा भाऊ संचालक असलेल्या प्रथमेश वाहतूक कंपनीने कोणताही अर्ज केलेला नसताना महामंडळाकडून तिला १ कोटी ३० लाख रुपयांची खैरात वाटण्यात आली. अशा अनेक प्रकरणांबाबतची विस्तृत माहिती सीआयडीच्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)
या घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदम याच्याविरुद्ध अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नाही. लवकरच ते दाखल करू, असे सीआयडीच्या सूत्रांनी सांगितले. कदम सध्या तुरुंगात आहे. महामंडळाच्या दोन माजी व्यवस्थापकीय संचालकांसह अनेक आरोपी अजूनही फरार आहेत.

Web Title: Chargesheet filed against four people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.