लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासह त्याच्या साथीदारांविरोधात १ हजार ४६४ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात कुंद्रालाच मुख्य सूत्रधार ठरविण्यात आले आहे.
मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. यात सुरुवातीला १ एप्रिल रोजी ९ जणांविरुद्ध
३ हजार ५२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले. पुढे यात, कुंद्रा विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीत व्यवस्थापकीय संचालक असलेल्या उमेश कामतच्या चौकशीतून कुंद्रा याचे अनेक ‘राज’ बाहेर आले.
मालमत्ता कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पॉर्न व्हिडिओ रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असताना हॉटशॉट ॲपचा सूत्रधार कुंद्रा हाच असल्याचे आढळून आले. त्यानुसार कुंद्रासह साथीदार रायन थोर्पला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती.
कुंद्रा आणि रायनने अटक केलेल्या आरोपींशी संगनमत करून सिनेक्षेत्रात स्ट्रगल करणाऱ्या नवोदित तरुणींच्या कमकुवत व आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अश्लील चित्रीकरण केले, तसेच त्यांचे अश्लील व्हिडिओ वेबसाइट, तसेच मोबाइल ॲप्लिकेशनवर अपलोड केले. यातून गैरमार्गाने लाखो रुपयांची कमाई केल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
यातील काही महिलांना मोबदला देण्यात आला, तर काहींची मोबदला न देता फसवणूक केल्याचेही तपासात समोर आले आहे. गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण पुरावे, व्हॉटस्ॲप चॅट, मेल हे मोबाइल, लॅपटॉपमधून नष्ट केले आहे. त्यानुसार, कुंद्रा, रायनसह सिंगापूर येथे राहणारा फरारी आरोपी यश ठाकूर ऊर्फ अरविंद कुमार श्रीवास्तव, लंडन येथील रहिवासी कुंद्रा याचा भाऊजी प्रदीप बक्षी यांच्याविरोधात किल्ला कोर्टात १ हजार ४६४ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. वरील सर्व माहितीचा उल्लेख दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.
आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, १३ जणांविरुद्ध ४ हजार ९९६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मालमत्ता कक्षाकडून अधिक तपास सुरू आहे.