मुंबई : लोकल डब्यातील उद्घोषणांमधून अश्लील आवाज ऐकू आल्याची घटना २७ आॅक्टोबर रोजी घडली होती. मोबाइलवर ‘अश्लील’ व्हिडीओ बघण्यात दंग राहिलेल्या गार्डकडून डब्यातील उद्घोषणा यंत्रणा सुरूच राहिली होती आणि त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला होता. यात गार्डला निलंबित केल्यानंतर आता त्याच्यावर चार्जशीट (आरोपपत्र) दाखल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. बोरीवलीहून चर्चगेटला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये गार्ड एस. शर्मा कार्यरत होते. अंधेरी स्थानकात येताच, ही ट्रेन जलद असल्याची उद्घोषणा त्यांनी आपल्या डब्यातून केली. मात्र, मोबाइलवर अश्लील प्रकार बघण्यात दंग असणाऱ्या शर्मा यांच्याकडून उद्घोषणा यंत्रणा मात्र चालूच राहिली. त्यामुळे मोबाइलमधील आवाज यंत्रणेमधून गेले आणि लोकलच्या सर्व डब्यांत ऐकू येऊ आले. अंधेरी ते ग्रॅन्ट रोडपर्यंत हा प्रकार सुरूच असताना काही प्रवाशांनी ग्रॅन्ट रोड स्थानकात उतरून, त्याबाबतची तक्रार स्टेशन मास्तरांकडे केली. त्याची गंभीर दखल पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली. (प्रतिनिधी)गार्डला निलंबित करण्यात आल्यानंतर आता त्याच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. त्याची चौकशी होईल आणि गार्डला आपल्यावरील आरोप खोटे आहेत हे सिद्ध करावे लागेल. आरोप सिद्ध करण्यासाठी आमच्याकडूनही प्रयत्न राहतील. - शैलेन्द्र कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक
गार्डवर चार्जशिट
By admin | Published: November 06, 2015 2:12 AM