मुंबई : राज्यात शासन स्तरावर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही मुंबई विद्यापीठाकडून मात्र पुढील काही परीक्षांसाठी तसेच अंतिम वर्षाच्या काही सत्रांसाठी परीक्षांसाठी नोंदणी शुल्क आकारण्यात येत आहे.
परीक्षा रद्द असतानाही मुंबई विद्यापीठ एम. एस. सी. मॅथमॅटिकच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला १४०० आणि आता १७०० असे वाढीव शुल्क भरण्यास संगितल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने केली आहे. मुबंई विद्यापीठाच्या १५० विद्यार्थ्यांकडून हे शुल्क भरण्याचा अट्टाहास सुरु असल्याची माहिती विद्यार्थी भारतीच्या अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली. परीक्षांचा निकाल आणि प्रमाणपत्रे यांच्यासाठी जर विद्यापीठाला पैसे लागणार असतीलच तर त्याचा खर्च ही त्यांनी जाहीर करावा आणि तसे शुल्क आकारण्यात यावे.राज्यपालांना पत्रपरीक्षा रद्द केलेल्या असताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडून इतके अवाजवी शुल्क आकाराने म्हणजे गैरप्रकार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिव स्रेहल कांबळे यांनी दिली. आमच्या संस्थेने या शैक्षणिक वर्षाची शुल्क रचना कमी करण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहिले असल्याची माहिती स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली.