मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एसी डबलडेकर बसेसचा ताफा दाखल होत आहे. डबलडेकर बसेस पार्किंग करण्यासाठी तीन डेपोत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. देवनार, दिंडोशी, वांद्रे या डेपोत दुमजली पार्किंग व्यवस्था करण्यात येत असून, निवासी व व्यावसायिक हब बनविण्यात येणार आहे. यासाठी बेस्ट उपक्रमाकडून निविदा मागविण्यात आल्याने या तीन डेपोत दुमजली पार्किंग, चार्जिंग स्टेशन, निवासी व व्यावसायिक हब उपलब्ध करण्यात येणार आहे.
बेस्टच्या बसेसना प्रवाशांची मिळणारी पसंती लक्षात घेता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात सामील होत आहेत. बसेस पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा गरजेची आहे. त्यामुळे बस आगारात दुमजली पार्किंग उभारल्यास बसेस पार्क करणे शक्य होणार आहे. भविष्यात बस गाड्या पार्किंगसाठी जागेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याचा विचार करून बेस्टने दुमजली बस पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या देवनार, दिंडोशी आणि वांद्रे हे तीन आगार दुमजली पार्किंगसाठी निवडण्यात आली आहेत. यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. देवनार व दिंडोशी सी. एन. जी. आहे. वांद्रे बस डेपोत सी. एन. जी. सुविधा उपलब्ध नाही. मात्र, तिन्ही बस आगारात कॅन्टीनची सुविधा उपलब्ध आहे.
बेस्ट आगाराच्या जागांवर राजकारण्यांचा आधीपासूनच डोळा आहे. त्यामुळेच पुनर्विकासाच्या नावाखाली जमिनी खासगी विकासकांना दिल्या जात आहेत. बेस्ट उपक्रम बंद करण्याचा घाट असून, तो सुरू ठेवण्यासाठी आतापर्यंत काय केले, याची माहिती जाहीर करावी. - रूपेश शेलटकर, आपली बेस्ट आपल्याचसाठी संस्था
आयएफसीकडून अभ्यास :
या बस गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दुमजली पार्किंग उभारले जाणार आहे. तसेच डेपोचा पुनर्विकास करण्यासाठी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) ही वर्ल्ड बँकेची सल्लागार असलेली कंपनी या सर्वांचा अभ्यास करत आहे.
संघटनांकडून विरोध :
बेस्ट उपक्रमाची सर्व मालमत्ता ही मुंबई महापालिकेची म्हणजेच मुंबईकर जनतेची मालमत्ता आहे.
ती कवडीमोल भावाने खासगी विकासकांना देणे, विकासाच्या नावाखाली खासगी विकासकांच्या संपत्तीत भर घालणारी ठरते आणि त्यातून जनतेचे कोणतेही हीत साध्य होत नाही.
त्यामुळे बेस्ट कामगारांचा पर्यायाने बेस्ट वर्कर्स युनियनचा व अशा योजनांना तीव्र विरोध असेल, अशी भूमिका बेस्ट संघटनांकडून घेण्यात आली आहे.