Join us

इलेक्ट्रिक वाहनांसाठी मुंबईत चार्जिंग स्टेशन; महापालिकेचा पहिला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 12:49 AM

इंधन आणि पैशांची बचत, वाहन खरेदीचा आणि देखभाल खर्च कमी, प्रदूषण होत नाही

शेफाली पंडित-परब  

मुंबई : इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्राने अवलंबले आहे़ मात्र मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनचे प्रमाण अत्यल्प आहे़ यामुळे सार्वजनिक वाहनतळाच्या जागेतच चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे़ याचा पहिला प्रयोग हुतात्मा चौक येथील वाहनतळ येथे होणार आहे़

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी सवलती दिल्या आहेत़ त्यामुळे काही बड्या कंपन्यांनीही इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणली़ बेस्ट उपक्रमाने येत्या वर्षभरात पाचशे इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेतला आहे़ यासाठी बस आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन्सही उभारण्यात येणार आहेत़ त्याचबरोबर सध्या इलेक्ट्रिक रिक्षांचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे़ वाहनतळाच्या परिसरातच असे चार्जिंग स्टेशन असल्यास वाहनांचे पार्किंग आणि चार्जिंग असे दुहेरी उद्दिष्ट साध्य होणार आहे़ सध्या हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्या जागेत असे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल़ त्याचबरोबर चर्चगेट, फोर्ट, कुलाबा या परिसरात आणखी पाच ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे़इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी असे चार्जिंग स्टेशन असणे आवश्यक आहे़ याबाबत तीन महिन्यांपूर्वी पालिका महासभेत ठरावाची सूचनाही मंजूर करण्यात आली होती़ ए विभाग क्षेत्रात असे चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी सध्या प्रस्ताव तयार होत आहे़ महिन्याभरात ही सोय उपलब्ध होईल़ कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकीतून (सीएसआर) काही चार्जिंग स्टेशन उभारता येतील़- मकरंद नार्वेकर (स्थानिक नगरसेवक, भाजप)इलेक्ट्रिक वाहनांचा फायदा

  • इंधन आणि पैशांची बचत, वाहन खरेदीचा आणि देखभाल खर्च कमी, प्रदूषण होत नाही
  • मुंबईतील वाहनांची संख्या ३७ लाख ८६ हजार ४४८ एवढी आहे़ तर एप्रिल २०१८ ते २४ सप्टेंबर २०१९ या कालावधीत ९३२६ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी राज्यात झाली आहे़
  • बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातही २५ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत़ तर आणखी पाचशे इलेक्ट्रिक बस घेण्यात येणार आहेत़
टॅग्स :इलेक्ट्रिक कारमुंबई महानगरपालिका