गौरी टेंबकर - कलगुटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाशी लढा देताना नागरिकांना सहकार्य करण्यासाठी पालिकेने वॉररूम तयार केले; मात्र या ठिकाणी संपर्क केल्यावर योग्य उत्तर मिळत नाही, कोणी फोन उचलत नाही किंवा माहिती मिळत नाही, असे अनेक आरोप केले जात आहेत. नुकतेच महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील एका 'वॉररूम' ला भेट देत मुंबईकरांना त्रास होतोय, असे म्हणत कर्मचाऱ्यांना झापले; मात्र हे प्रकार का घडत आहेत? आणि याला आम्ही खरेच जबाबदार आहोत का? यामागचा विचार कोणी करत नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष ओढवून घ्यायचा नसेल तर वॉररूम प्रतिनिधींच्या काही प्रश्नांचा प्रशासनाने विचार करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याचाच 'लोकमत' ने घेतलेला हा आढावा :
* ‘कॉलर आयडी’ आणि कानाला दाबलेले फोन ‘रिसिव्हर’
महापौरांनी आर दक्षिण विभागात भेट दिली तेव्हा वॉर रूममध्ये असलेल्या फोनला कॉलर आयडी नसल्याचे समाेर आले. मुंबईत बहुतांश ठिकाणी हीच स्थिती आहे. त्यामुळे एखाद्याने फोन केला तर तो कोणाचा होता, हे समजू शकत नाही. एखाद्याचा फोन आला की संबंधिताची माहिती घेऊन नंतर तो वेटिंगवर ठेवून आम्ही डॉक्टरला त्याबाबत कळवतो. या प्रक्रियेदरम्यान अन्य कोणी फोन केला तर तो व्यस्त दाखवतो किंवा बऱ्याचदा रिंगही वाजते. बरेच फाेन खराब झालेले असून, त्यातून नीट आवाज यावा यासाठी कानाला रिसिव्हर घट्ट पकडावा लागतो, तरीही अनेकदा समोरच्याचा आवाज नीट ऐकू येत नाही त्यामुळे याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
* 'रेमडेसिविर' आम्ही कुठून उपलब्ध करून देणार?
वॉररूमला सध्या सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘आम्हाला रेमडेसिविर कुठे मिळेल’? मुळात आम्हाला खरेच या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही; मात्र यासाठी अनेकदा रुग्णाचे नातेवाईक भांडू लागतात, शिवीगाळ करतात. त्यामुळे आम्ही ते इंजेक्शन कुठून उपलब्ध करून द्यायचे, ते आता प्रशासनानेच आम्हाला सांगावे.
* ‘हेल्पलाइन’ नाही ‘हेल्प लेस’ लाइन!
वॉररूमच्या क्रमांकावर येणारे आमच्याकडे मदत मागण्यासाठी येतात. रडतात, बडबडतात, गयावया करतात आणि प्रसंगी चिडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळही करतात. आम्ही सगळे सहनही करतो, कारण आम्हाला त्यांच्या मानसिकतेची कल्पना असते; मात्र आज आरोग्य सुविधा, बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन या सगळ्यांचा तुटवडा असताना आम्ही नागरिकांची मदत कशी करायची, हे आम्हालाच कळत नसून त्यामुळे आम्ही स्वतःला ‘हेल्पलाइन’पेक्षा ‘हेल्पलेस लाइन’ समजू लागलो आहाेत.
* मानसिक आघाताचे काय?
आमच्यापैकी बरेच जण जे शिक्षक आहेत, त्यांनी कोविड सेंटरमध्येही कर्तव्य बजावले आहे. त्यावेळी बऱ्याच रुग्णांना जीव सोडताना पाहिले आहे. त्यामुळे हे सर्व पाहून आमच्यावर जो मानसिक आघात होतो त्याचे काय? याकडे काेण लक्ष देणार?
* ‘ड्रॉप फॅसिलिटी’चा विचार करावा
वॉररूम प्रतिनिधींमध्ये ज्या महिला कर्मचारी आहेत, त्या लांबून याठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी येतात. दुपारची शिफ्ट ही ३ ते ११ ची असते. त्यामुळे रात्री ११ वाजता वॉररूममधून बाहेर पडल्यावर बऱ्याचदा रिक्षा मिळत नाही. पायी स्टेशन गाठावे लागते. रस्ता सामसूम असल्याने काही अप्रिय प्रकार घडेल, याची धाकधूक असते. त्यामुळे 'ड्रॉप' फॅसिलिटीचा विचार करण्यात यावा.
..............................