Join us

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 5:37 AM

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अन्य नेत्यांनीही वापरला होता हाच रथ

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान वापरलेला रथ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या महाजनादेश यात्रेसाठी वापरणार आहेत. या रथाची आवश्यक डागडुजी करण्यात आली असून हा रथ मंगळवारी ३० जुलै रोजी मुंबईहून अमरावतीला प्रस्थान करणार आहे. भाजप प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता रथाला झेंडा दाखवून रथ रवाना होईल.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला १ आॅगस्टपासून अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून सुरुवात होईल. या यात्रेसाठी वापरला जाणारा रथ लवकरच मोझरीत दाखल होईल. पर्यायी व्यवस्था म्हणून आणखी एक रथदेखील तयार ठेवण्यात आला आहे. पहिला टप्पा १ ते ९ आॅगस्ट दरम्यान तर, १६ ते ३१ आॅगस्ट दरम्यान दुसऱ्या टप्प्यात राज्यातील विविध जिल्ह्यांतून ही यात्रा निघेल. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेदरम्यान २५ दिवस रथातच असतील. अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी गेली सहा वर्षे या रथाचा आपल्या यात्रांसाठी वापर केला होता. मध्य प्रदेश, दिल्ली, ओडिशात प्रचारासाठी हा रथ वापरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित महाजनादेश यात्रेच्या बोधचिन्हाचेही सोमवारी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबईतील प्रदेश कार्यालयात अनावरण करण्यात आले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामुंबई