मुंबई : गेल्या वर्षी भायखळा येथील ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आलेले शक्ती आणि करिश्मा आता मुंबईच्या वातावरणात चांगलेच रुळले आहेत. आक्रमक आणि रुबाबदार अशा या जोडीच्या हालचाली आणि वाघांचे महत्त्व सांगणारी चित्रफीत ‘द मुंबई झू’ या ऑनलाइन व्यासपीठावर नुकतीच प्रदर्शित करण्यात आली.
गेली १४ वर्षे राणीच्या बागेत वाघाचे दर्शन मुंबईकरांना झाले नाही. अखेर राणी बागेच्या नूतनीकरण प्रकल्पाअंतर्गत फेब्रुवारी २०२० मध्ये वाघाची जोडी औरंगाबाद येथून आणण्यात आली. यापैकी करिश्मा नावाची वाघीण सात वर्षांची असून शक्ती वाघ पाच वर्षांचा आहे. मात्र, येथील वातावरणाशी त्यांनी जुळून घेईपर्यंत वाघाच्या या जोडीला विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
राणी बागेत झाडावर खेळताना, आपले अन्न तोंडात घेऊन येरझाऱ्या घालताना, पाण्यात आंघोळ करतानाची या वाघांची दृश्ये टिपून त्याची एक चित्रफीत तयार करण्यात आली आहे. ही चित्रफीत व्याघ्र दिनानिमित्त गुरुवारी प्रदर्शित करण्यात आली. वाघांविषयीचे कुतूहल निर्माण करण्यासाठी जनजागृती करणे हा या चित्रफितीचा उद्देश आहे.
काय आहे या चित्रफितीत?
वन्यजीवांची तस्करी, मानव-प्राणी संघर्ष, धोक्यात आलेला अधिवास यांचे दुष्परिणाम वाघांच्या संख्येवर होत आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आता वाघांची संख्या वाढताना दिसत असल्याचे या चित्रफितीत म्हटले आहे.
पोस्टर मेकिंग स्पर्धा
व्याघ्र दिनानिमित्त पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन राणीच्या बागेमार्फत करण्यात आले आहे. शनिवारी सं. ७ वाजेपर्यंत आपल्या फलकाचे छायाचित्र फेसबुक, इन्स्टाग्रामवर प्रकाशित करून त्यात ‘द मुंबई झू’ला टॅग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.