धर्मादाय रुग्णालये थेट गरीब रुग्णांच्या दारी! ४ नोव्हेंबर रोजी मुंबईत तपासणी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:57 AM2017-11-03T01:57:47+5:302017-11-03T01:58:08+5:30
मुंबई : एरवी निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणारी धर्मादाय रूग्णालये आता थेट गरीब आणि गरजूंच्या दारी जाऊन त्यांची तपासणी करणार आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि मुंबईतील धर्मादाय रूग्णालयांनी ही अभिनव मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ७६ धर्मादायांसह दोन खासगी रूग्णालयांचे वैद्यकीय पथक झोपडपट्टया आणि पदपथावरील रूग्णाची वैद्यकीय तपासणी करणार आहेत.
बॉम्बे हॉस्पिटल, लीलावती, हिंदुजासह ७६ धर्मादाय रुग्णालये तसेच सुश्रुषा आणि गोदरेज ही खासगी रुग्णालये ४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील रस्त्यावरील गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करणार आहेत. गंभीर आजारी रु ग्णांना थेट आपल्या रु ग्णालयात दाखलही करणार आहे.
राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे आणि मुंबईतील धर्मादाय रुग्णालयांच्या प्रतिनिधींची यासंसर्भात अलीकडेच एक बैठक झाली. या बैठकीत थेट गरजु रूग्णांपर्यंत पोहचून त्यांच्यावर आवश्यक औषधोपचार करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबईतील एकूण ७६ धर्मादाय रु ग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी सुमारे १७०० खाटा राखीव आहेत. अनेकदा गरीब आणि गरजू रूग्ण
मोठ्या रूग्णालयांमध्ये जाण्यास कचरतात. त्यासाठी रु ग्णालय आपल्या दारी ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. धर्मादाय रु ग्णालयांनी ही संकल्पना उचलून धरली आहे. प्रायोगिक तत्वावर मुंबईत ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानंतर राज्यभर अशा तपासणी मोहिमा आयोजित करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
...तर नवे प्रश्नचिन्ह
धर्मादाय रुग्णालये प्रत्येकी दोन रूग्णवाहिका, वैद्यकीय पथक, वैद्यकीय चाचण्या व उपचारांसाठी आवश्यक उपकरणे आणि औषधांच्या साठ्यासह आपापल्या परिसरातील झोपडपट्टया, पदपथावरील रु ग्णांसाठी तपासणी मोहीम हाती घेतील. तर, छोटी रु ग्णालये एक रुग्णवाहिका, डॉक्टर व उपकरणांसह मोहिमेत सहभागी होतील.