Join us

धर्मादाय रूग्णालयांची माहिती आता आरोग्य आधार ॲपवर

By संतोष आंधळे | Published: August 24, 2023 2:30 PM

आरोग्य संस्थांच्या आराखड्याचे सादरीकरण यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रूग्णालयात वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा यासाठी रूग्णालयांची अद्ययावत माहिती “आरोग्य आधार’ या ॲपद्वारे देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. मंत्रालयात बुधवारी धर्मादाय रूग्णालयांतर्गत सुविधा रूग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्पीटल रजीस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, नॅशनल हेल्थ मिशन २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या  आराखड्याचे सादरीकरण यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

 आरोग्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले की, धर्मादाय रूग्णालयाच्या कार्याबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करताना पारदर्शी काम व्हावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. धर्मादाय रूग्णालयाची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी, आरोग्य आधार ॲप रूग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपद्वारे रूग्णांना नजीकचे धर्मादाय रूग्णालय, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, उपलब्ध खाटांची संख्यांची माहिती तसेच तात्काळ खाट राखीव करता येणार आहे. वॉर रूम, आरोग्य दूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापनाला यासंदर्भात माहिती एकाच वेळी मिळणार आहे. 

भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, सामान्य रूग्णालय, महिला व बाल आरोग्य केंद्र यांची मोजणी करण्यात आली आहे. केवळ अंतर आणि जिल्हा यानुसार केंद्रांची मागणी न करता जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची मागणी करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले. बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरज कुमार, धर्मादाय आयुक्त श्री. महाजन यांसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :आरोग्य