Join us

धर्मादाय रुग्णालये आणि इंधन भेसळीची करा तक्रार

By admin | Published: May 04, 2017 6:24 AM

हिंदू जनजागृती समितीने धर्मादाय रुग्णालये आणि इंधनातील भेसळीविरोधात ‘सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन’ अभियान पुकारले आहे

मुंबई : हिंदू जनजागृती समितीने धर्मादाय रुग्णालये आणि इंधनातील भेसळीविरोधात ‘सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन’ अभियान पुकारले आहे. या अभियानांतर्गत देशभरातून तक्रारींचा ओघ सुरू झाला असून, अधिकाधिक नागरिकांनी अभियानात सामील होण्याचे आवाहन बुधवारी समितीने केले आहे.डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानाअंतर्गत शासनाकडून सवलत घेणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांना नियमाप्रमाणे गोरगरीब आणि दुर्बल घटकांना विनामूल्य, तसेच सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देणे, खाटा उपलब्ध करून देणे अशा गोष्टी बंधनकारक आहेत. मात्र, अनेक रुग्णालये या नियमाचे पालन करीत नसल्याचे हिंदू जनजागृती समितीच्या लक्षात आले.त्यामुळे अशा नियमबाह्य कृती करणाऱ्या आणि गोरगरिबांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांच्या विरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांमधील धमार्दाय आयुक्तांकडे रीतसर तक्रारी करण्यात आल्याचे समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी सांगितले.शिंदे म्हणाले की, मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत धर्मादाय आयुक्तांना तक्रार केल्यानंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. औरंगाबादचे धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी या प्रकरणी तत्काळ बैठक घेऊन, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक आणि समिती सदस्यांचे एक पथक स्थापन केले. दुसऱ्या दिवशी या पथकाने काही रुग्णालयांना अकस्मात भेटी दिल्या आणि रुग्णालयांत आढळलेल्या स्थितीचे तत्काळ पंचनामेही केले. देशभरात विविध ठिकाणी शासकीय कार्यालयांत तक्रारी करण्यात आल्या असून, या अभियानामध्ये अनेक समविचारी संघटनांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)