Join us

मिरवणुकीत चारकोप पोलिसांना मारहाण

By admin | Published: September 26, 2015 1:25 AM

समतानगर पाठोपाठ चारकोप पोलिसांवरही गणपती विसर्जनाच्या रात्री मिरवणुकीतील लोकांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला.

मुंबई : समतानगर पाठोपाठ चारकोप पोलिसांवरही गणपती विसर्जनाच्या रात्री मिरवणुकीतील लोकांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला. या हल्ल्यामध्ये त्या रात्री गस्तीवर असलेले दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याचा हात आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चारकोप परिसरात एका टॅक्सीचालकाने मोटारसायकलला धडक दिली. त्यात मोटारसायकलचे नुकसान झाले. त्यामुळे टॅक्सीचालकाने नुकसानभरपाई म्हणून दोन हजार रुपये द्यावे, असे मोटारसायकलस्वाराचे म्हणणे होते. त्यावरूनच या दोघांमध्ये बाचाबाची सुरू होती. त्या वेळी चारकोप पोलिसांचे गस्तीवर असलेले साध्या गणवेशातील पोलीस कर्मचारी मोटारसायकलवरून घटनास्थळी पोहोचले. या दोघांनाही त्यांनी आपापसात भांडण मिटवा अथवा पोलीस ठाण्यात चला, असे सांगितले. त्या वेळी याच परिसरातून विसर्जन करून परतत असलेला एक घोळका जात होता. त्यांनी या ठिकाणी विनाकारण येत हुज्जत घालत सध्या वेशातील पोलिसांना तुम्ही मध्ये पडू नका, ते दोघे आपापसात बघून घेतील, असे दरडावले. यावरून मोटारसायकलस्वार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यामुळे चार ते पाच जणांनी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. ज्यात हे दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दोघांचेही हात फ्रॅक्चर झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणी ‘लोकमत’ने चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांना विचारले असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. पोलिसांना दुखापत झाल्याचेही त्यांनी नमूद केले. या हल्लेखोरांमधील एक जण हा राजकीय पक्षाचा स्थानिक पदाधिकारी असून त्याच्यावरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते. (प्रतिनिधी)