Join us

पुलामुळे बाधित होणारे चारकोपवासीय आक्रमक, कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याविरोधात तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:12 IST

नागरिकांच्या विरोधावर तोडगा काढण्यासाठी महापालिका अधिकारी स्थानिक रहिवासी आणि आमदारांसोबत पाहणी दौरा करून निर्णय घेणार होते. मात्र, अधिवेशनामुळे दौरा लांबल्याची चर्चा आहे. 

मुंबई : कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा-दहिसरच्या विस्तारासाठी कांदिवलीतील स्थानिकांनी लावलेल्या १९० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. त्यास स्थानिकांनी विरोध केला असून, पुलामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या चारकोप सेक्टर ८ विकास समितीने पालिकेच्या पूल विभागाला पत्र लिहून विविध तक्रारी केल्या आहेत. पालिकेच्या पथकाने चारकोपला भेट देऊन कोस्टल रोडचा पुढचा टप्पा कसा असेल, याची माहिती देण्याची मागणी केली आहे.नागरिकांच्या विरोधावर तोडगा काढण्यासाठी महापालिका अधिकारी स्थानिक रहिवासी आणि आमदारांसोबत पाहणी दौरा करून निर्णय घेणार होते. मात्र, अधिवेशनामुळे दौरा लांबल्याची चर्चा आहे. कोस्टल रोडचा दुसरा टप्पा वर्सोवा ते भाईंदरपर्यंत आहे. पालिकेने भूसंपादन करण्यासोबत आवश्यक तेथे जागा मोकळी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून कांदिवलीतील चारकोप सेक्टर ८ येथील ३०० हून अधिक झाडे हटवून आणि त्याचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. यास स्थानिकांचा प्रचंड विरोध होत आहे. चारकोप विकास समितीकडून पालिकेच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रारी दाखल केल्या असून, त्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. 

पार्किंग करायची कुठे? पालिकेच्या माहितीनुसार इमारतींपासून ३० फूट अंतरावर असलेली झाडे कापण्यात येतील आणि खारफुटी संरक्षणासाठी असलेल्या भिंतीचे पाडकाम करण्यात येईल. मात्र, पुनर्रोपणानंतर झाडे जगतील का? असा प्रश्न स्थानिकांनी केला आहे.  वाहने पार्क कुठे करायची? अरुंद रस्त्यावरून शाळांच्या बस कशा जाणार?, हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

पालिका आणि आमदारांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघालेला नाही. पालिकेकडून समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. पालिकेच्या प्रकल्पाचा आराखडा काय आहे? आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. माहिती मिळणे आमचा अधिकार आहे. आम्ही त्यासाठी लढा देणार आहोत.  मिली शेट्टी, पर्यावरणतज्ज्ञ