मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथील सेक्टर आठ जवळील लोटस पॉन्ड परिसरातील कांदळवनाला सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन जवानांना आग विझविण्यात यश आले. आग कशी लागली, याचे कारण अद्याप समजलेले नाही.
स्थानिक रहिवासी मिली शेट्टी यांनी या संदर्भात सांगितले की, कांदळवन क्षेत्राला आग लागण्याची घटना कळताच, अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्या होत्या. चारकोप परिसरातील कांदळवनात हल्ली मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. रात्री-अपरात्री ही आग लागते. आग ही नैसर्गिकरीत्या लागतेय की मानवनिर्मित लावली जातेय, हेच काही कळत नाहीये. आगीमुळे अनेक झाडे, पक्षी व प्राण्यांचा नाहक बळी जातो. पश्चिम कांदळवन विभागाने आगीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.