‘चार्ली’ ऑक्सिजनसाठी मान्सूनदरम्यान लावणार ४०० झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:07 AM2021-05-12T04:07:24+5:302021-05-12T04:07:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू लागल्याने त्यांना आसपासच्या रुग्णालयात हलविण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू लागल्याने त्यांना आसपासच्या रुग्णालयात हलविण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली. त्यानंतर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून सेवाभावी संस्थाही सरसावल्या. भविष्यात ऑक्सिजनची पृथ्वीतलावर कमतरता भासू नये म्हणून सर्वच स्तरातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ चा नारा देण्यात येत असून मुंबईच्या उपनगरात पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारा चार्ली स्पोर्ट्स क्लबही यंदाच्या मान्सूनदरम्यान विक्रोळी हायवे परिसरासह लगतच्या परिसरात आंबा आणि जांभळाची तब्बल ४०० हून अधिक झाडे लावणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात गेल्या दीड वर्षांपासून चार्ली स्पोर्ट्स क्लबने विक्रोळी येथील आपल्या नर्सरीमध्ये जांभूळ आणि आंब्याची झाडे लावली आहेत. ही झाडे ४०० च्या आसपास असून, आता या झाडांची उंची तीन ते चार फूट झाली आहे. परिणामी आता ती विक्रोळी हायवे परिसरासह लगतच्या परिसरात लावण्यात येणार असल्याचे क्लबकडून सांगण्यात आले. मुळात आपण जी फळे खातो त्याच्या बिया टाकून न देता क्लबने त्या मातीत राेवल्या हाेत्या. आता या झाडांच्या माध्यमातून येथील परिसर हिरवळीचा होईल. शिवाय प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास क्लबने व्यक्त केला. महत्त्वाचे म्हणजे एखाद्या मुंबईकराला आपल्या परिसरात ही झाडे लावायची असतील तर त्यांना ती मोफत दिली जातील, असेही क्लबकडून सांगण्यात आले.
.............................................