बेस्ट संग्रहालयात ‘विस्टाडोम’ कोचचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 04:26 AM2018-08-13T04:26:53+5:302018-08-13T04:27:03+5:30
वडाळा येथील आणिक बस डेपोमधील बेस्ट संग्रहालयात भारतीय रेल्वेतील ‘विस्टाडोम’ कोचची कागदी प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
मुंबई : वडाळा येथील आणिक बस डेपोमधील बेस्ट संग्रहालयात भारतीय रेल्वेतील ‘विस्टाडोम’ कोचची कागदी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. आणिक बस डेपोतील बेस्ट संग्रहालयाचे सहायक कार्यदेशक यतीन पिंपळे यांनी कागदी कोच मॉडेल बनविले आहे. भारतीय रेल्वेमध्ये ‘विस्टाडोम’ हा वैशिष्ट्यपूर्ण कोच मुंबईमधून दादर ते मडगाव एक्स्प्रेस दरम्यान धावतो; तर दुसरा कोच हा दक्षिण भागातील अराकुवेल्ली ते विशाखापट्टणम्पर्यंत धावतो. निसर्गसौंदर्य न्याहाळता यावे, यासाठी या कोचची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विस्टाडोम’ कोचमध्ये एकूण ४० आसने असून ही आसने ३६० अंशात फिरतात. तसेच कोचच्या शेवटी मोकळी जागा ठेवून प्रवाशांना फोटो आणि सेल्फी काढण्यास विशेष व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून निसर्गाचा आनंद लुटता येतो. गाडीच्या सर्वात शेवटी हा कोच लावला असून पूर्णपणे वातानुकूलित आहे. आता हा कोच पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बनले आहे. अंत्योदय, हमसफर, दीनदयाल इत्यादी प्रकारचे कोच आता भारतीय रेल्वेमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय रेल्वेमध्ये जे बदल होत आहेत, त्यातील एक बदल म्हणजे ‘विस्टाडोम’ कोच होय. विदेशातील रेल्वे अशा प्रकारे दिसून येतात. परंतु विदेशी रेल्वेची नक्कल न करता फक्त कल्पना घेऊन ‘विस्टाडोम’ कोच साकारण्यात आला आहे. ‘विस्टाडोम’ हा अत्याधुनिक कोच चेन्नईमध्ये बनविण्यात आला आहे. पर्यटन कोच असल्यामुळे याचे भाडे अधिक आहे.
भारतीय रेल्वेतील ‘विस्टाडोम’ या कोचचे कागदी मॉडेल बनवून बेस्ट संग्रहालयात ठेवले आहे. कोचमध्ये एलईडी लाइट असून ९ व्होल्टची बॅटरी लावण्यात आली आहे. संग्रहालयामधला कागदी कोच हा मूळ कोचच्या ९० पट लहान आहे. तसेच संग्रहालयामध्ये काही कागदी मॉडेलच्या रेल्वे बॅटरीवर धावतात, तर त्यांना हा कोच जोडण्याचा विचार सुरू आहे.
मूळ ‘विस्टाडोम’ कोचच्या आकारापेक्षा जरा मोठा कोच बनविण्याचे काम सुरू आहे. भारतीय रेल्वेने कोचचा आराखडा दिला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याचे ड्रॉइंग चेन्नईमधून मागविले. त्यानंतर या कोचची प्रतिकृती निर्माण झाली, अशी माहिती यतीन पिंपळे यांनी दिली.