Join us

महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी संस्कृतीचे मनोज्ञ दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 1:47 PM

महाराष्ट्र दिन : ४३ चित्रध्वनिफितीने घडविले महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी संस्कृतीचे मनोज्ञ दर्शन; सोमैया महाविद्यालयाच्या मराठी विभागाचा उपक्रम

मुंबई : महाराष्ट्राच्या स्थापनेला आज बरोबर साठ वर्षे पूर्ण झाली. सगळे काही सुरळीत असते तर राज्याचा हा हीरकमहोत्सव  महाविद्यालयात आपणा सर्वांच्या सहभागातून व साक्षीने दमदारपणे साजरा झालाच असता. परंतु सध्याच्या विपरित परिस्थितीत ते शक्य नाही, असे म्हणत विद्याविहार येथील क.जे.सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि मराठी प्रबोधनने चित्रध्वनीफितीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राची, मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची ओळख करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे  या उपक्रमात विद्यार्थी मित्रांसोबत शिक्षक वर्ग देखील सहभागी झाला आहे.जगभरात कोरोनाला थोपविण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे घरात बसून कोरोनाशी लढा लढला जात आहे. अशाच काहीशा वातावरणात महाराष्ट्र दिनीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, असे आवाहन सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. यास सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. अशाच काहीशा पार्श्वभूमीवर विद्याविहार येथील क.जे सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग आणि मराठी प्रबोधनने  एक एक मिनिटांच्या छोट्या चित्रध्वनिफिती करायचे ठरवले. विभागाशी जोडलेले शिक्षक आणि विद्यार्थी  यांना आवाहन करण्यात आले. आणि त्यातून साकारल्या महाराष्ट्र-मराठी भाषा-मराठी संस्कृती यांचे मनोज्ञ दर्शन घडविणा-या विविध ४३ चित्रध्वनिफिती. या चित्रध्वनीफितीमध्ये महाराष्ट्र, मराठी भाषा, संस्कृती यांची माहिती देण्यासह विविध गोष्टींचे दाखले देण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या फिती केवळ पंधरा सेंकदापासून अवघ्या एका मिनिटांच्या आहेत. त्यामुळे समाज माध्यमातून यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी संस्कृतीचे मनोज्ञ दर्शन संकल्पना ही मराठी विभागप्रमुख व महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. वीणा सानेकर यांची आहे. प्रा.अभिजित देशपांडे व प्रा. मीरा कुलकर्णी यांचे संयोजन आहे. प्रा. सुचेता नलावडे, प्रा. साधना गोरे, प्रा. अमोल भोसले यांनी यासाठी सहाय्य केले आहे.  क. जे. सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी यात सहभाग घेतला असून, समाज माध्यमातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :महाराष्ट्रकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस