मुंबई - घाटकोपर पश्चिम भागातील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळले. गुरुवारी (28 जून) झालेल्या या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पायलट, को-पायलट, तंत्रज्ञ या चार जणांसहीत एका पादचाऱ्याचा सामवेश आहे. दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचा विमानाचा ब्लॅक बॉक्स बचाव पथकाच्या हाती लागला आहे. या बॉक्समुळे अपघातामागील नेमकं कारण समोर येण्यास मदत मिळणार आहे. हा ब्लॅक बॉक्स आता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येईल. तपासणीदरम्यान, बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांची माहिती मिळू शकणार आहे.
(Chartered Plane Crashed In Mumbai : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू)
दुर्घटनेतील मृत्युमुखी 1. मारिया कुबेर- पायलट2. प्रदीप राजूत- को पायलट3. सुरभि- तंत्रज्ञ4. मनिष पांडे- तंत्रज्ञ
काय असतं या ब्लॅक बॉक्समध्ये?एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी दोन उपकरणं महत्त्वपूर्ण असतात. विमानाचे फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. एका उपकरणामध्ये कॉकपिटमधील संभाषण रेकॉर्ड होते तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, वेग आणि उंचीचे मोजमाप होते. ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागील भागात बसवलेला असतो, कारण दुर्घटनेच्या परिस्थितीत हा भाग सर्वात सुरक्षित समजला जातो. हा बॉक्स भगव्या रंगाचा असतो. जेणेकरून अपघातस्थळी भडक रंग पटकन तपास पथकास आढळून येण्यास मदत होते. एफडीआरद्वारे अपघाताआधी 25 तासांचा तपशील मिळतो तर सीव्हीआरद्वारे अपघातापूर्वीच्या 2 तासांचा तपशील मिळतो.
दरम्यान, महिला वैमानिकाच्या प्रसंगावधानानं हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समजल्यानंतर वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत गर्दीच्या ठिकाणावरून विमान जागृती इमारतीच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या मोकळ्या ठिकाणी वळवलं आणि तिथेच ते लँडिंग करत असताना कोसळलं. गजबलेल्या भागात इतरत्र कोठेही विमान कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती. मात्र, महिला वैमानिक मारिया यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.