मुंबईः घाटकोपरमध्ये चार्टर्ड प्लेन कोसळून झालेल्या अपघातात विमानातील चौघांसह एका पादचाऱ्याला प्राण गमवावे लागले आहेत. या दुर्घटनेनं मुंबईभर खळबळ उडालीय. परंतु, या विमानाला झालेला हा पहिलाच अपघात नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. हे विमान उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचं असताना अलाहाबादमध्ये ते अपघातग्रस्त झालं होतं, असं उत्तर प्रदेशातील एका प्रशासकीय अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.
घाटकोपर पश्चिमेच्या जीवदया नगरमध्ये दुपारी दीडच्या सुमारास स्फोटाचा आवाज झाला, आगीचे लोळ उठले आणि एकच हाहाकार उडाला. एक चार्टर्ड प्लेन कोसळल्यानं हा आगीचा भडका उडाल्याची माहिती थोड्याच वेळात समजली. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत-बचाव कार्य सुरू केलं. त्यावेळी या विमानाच्या शेपटावर उत्तर प्रदेश सरकारचा लोगो असल्याचं निदर्शनास आलं. स्वाभाविकच, हे विमान उत्तर प्रदेश सरकारचं असल्याचा समज झाला. परंतु, उत्तर प्रदेशच्या माहिती खात्याचे प्रधान सचिव अवनीश अवस्थी यांनी याबाबत खुलासा केला.
उत्तर प्रदेश सरकारनं हे विमान 2014 साली मुंबईतील यूवाय एव्हिएशन या खासगी कंपनीला विकलं होतं. अलाहाबादमध्ये या विमानाला अपघात झाल्यानंतर यूपी सरकारने ते आपल्या ताफ्यातून काढायचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, हे विमान दुरुस्त करून वापरण्याचा विचार यूवाय एव्हिएशनने केला होता. ही कंपनी चार्टर्ड प्लेन भाड्याने देते. त्यांनी विमानात तांत्रिक दुरुस्ती केली आणि त्याचीच चाचणी घेण्यासाठी आज महिला पायलटसह तीन तंत्रज्ञांनी जुहूहून 'टेक ऑफ' केलं होतं. पण, या चाचणीदरम्यानच होत्याचं नव्हतं झालं.
किंग एअर सी-90 प्रकारचं हे विमान होतं. त्यातून सात ते दहा जण प्रवास करू शकतात.