मुंबई- घाटकोपरमधल्या सर्वोदय रुग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात महिला वैमानिकासह इतर तिघांचा मृत्यू झाला असला तरी वैमानिकाच्या प्रसंगावधानानं हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समजल्यानंतर वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत गर्दीच्या ठिकाणावरून विमान जागृती इमारतीच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या मोकळ्या ठिकाणी वळवलं आणि तिथेच ते लँडिंग करत असताना कोसळलं.वैमानिकांना प्रशिक्षणादरम्यान अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. त्याच ट्रेनिंगच्या माध्यमातून या वैमानिकानं हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. दुर्घटनेत दुर्दैवानं वैमानिकासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपर पश्चिमेकडच्या जीवदया लेनमधल्या पृथ्वी बिल्डिंगजवळ हा अपघात झाला आहे. सदरचे चार्टर्ड विमान हे जुहू येथून टेस्टिंगसाठी नेत असतानाच दुर्घटनेत एका वैमानिकासह 4 जण आणि एका पादचा-याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
Chartered Plane Crashed In Mumbai: वैमानिकाच्या शौर्याला सलाम, प्रसंगावधान दाखवत वाचवले हजारोंचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 2:22 PM