Join us

वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 8:08 AM

सी-लिंक परिसरात वाहनांच्या ताफ्यासाठी पोलिस वाहतूक नियमन करत होते. रात्री ११ वा. ठाणे-वर्षा बंगलादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याची माहिती मिळताच लेन क्रमांक ७ व ८ ही राखीव ठेवली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंक येथे रविवार, ५ मे रोजी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे कार घेऊन निघालेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. शुभमकुमार कुमार (३०) असे त्याचे नाव असून, वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सी-लिंक परिसरात वाहनांच्या ताफ्यासाठी पोलिस वाहतूक नियमन करत होते. रात्री ११ वा. ठाणे-वर्षा बंगलादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याची माहिती मिळताच लेन क्रमांक ७ व ८ ही राखीव ठेवली. रात्री ११:१५ वा. ताफा वरळीकडे जात असताना, एक चालक गाडी चालवत लेन क्रमांक ७ मध्ये आला. पोलिसांनी त्याला लेन ६ मध्ये जाण्यास सांगितले. मात्र त्याने कार थांबवत वाद घातला. 

गुन्हा दाखल    त्याचबरोबर पोलिसांच्या निर्देशाचे पालन न करता कार ताफ्याच्या मागोमाग घुसवत तोदेखील वरळीच्या दिशेने जाऊ लागला. हा प्रकार लक्षात आल्यावर टोल प्लाझाच्या पलीकडे असलेल्या पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, मात्र तो थांबलाच नाही.     अखेर वांद्रे पोलिसांनी वरळी वाहतूक विभागाच्या मदतीने त्याला थांबवले. चौकशीत त्याने त्याचे नाव शुभमकुमार असल्याचे सांगितले, तसेच तो अभिनेता असल्याचेही त्याचे म्हणणे आहे. त्याच्यावर वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :एकनाथ शिंदेपोलिस