मुंबई: समस्त हिंदु आघाडीचे प्रमुख आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मनसेप्रमुखराज ठाकरेंची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. मिलिंद एकबोटे आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास पंधरा ते वीस मिनिटं चर्चा झाली.
मिलिंद एकबोटे यांना राज ठाकरेंच्या भेटीबाबत विचारले असता छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी 24 मार्चला होणार आहे. या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरेंनी संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी यावं आणि उपस्थित राहणाऱ्या सर्व शंभू भक्तांना मार्गदर्शन करावं, अशी विनंती करण्यासाठी मी आलो होतो असं मिलिंद एकबोटे यांनी सांगितले.
दरम्यान मनसेने घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत देखील मिलिंद एकबोटे यांनी केले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया मिलिंद एकबोटे यांनी यावेळी दिली.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर पुण्यात एट्रॉसिटी आणि दंगल भडकावणे या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यंदा १ जानेवारीला विजय दिनाच्या दिवशी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यासह १६३ जणांना पुणे जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली होती.