मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलवर २६ जानेवारी २०१८ रोजी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी देणारे पत्र बुधवारी सापडल्याने खळबळ उडाली. या प्रकारानंतर कार्गो टर्मिनल रिकामे करण्यात आले. सीआयएसएफ परिसराची कसून तपासणी करत असून शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.बुधवारी सायंकाळी ५च्या सुमारास हे पत्र कार्गो टर्मिनल इमारतीच्या शौचालयामध्ये सफाई कर्मचाºयांना सापडले. इसिस या दहशतवादी संघटनेकडून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलवर येत्या २६ जानेवारी रोजी हल्ला घडवून आणण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. घटनेची वर्दी मिळताच तपास यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. सीआयएसएफच्या जवानांनी संपूर्ण कार्गो टर्मिनल रिकामे केले. संशयास्पद व्यक्ती, वस्तूंची कसून चौकशी सुरू आहे. बॉम्बशोधक पथकानेही परिसर पिंजून काढला. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. प्रवाशांची पूर्ण तपासणी करूनच त्यांना विमानतळावर सोडण्यात येत आहे. हे सर्च आॅपरेशन रात्रभर सुरूच राहणार असून, संपूर्ण शहरात हायअलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती विमानतळाच्या जनसंपर्क अधिकाºयांनी दिली.या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. स्थानिक पोलीस ठाण्याकडूनही याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. ही खरेच धोक्याची सूचना आहे की कोणी तरी खोडसाळपणातून हा प्रकार केला आहे, याचाही तपास यंत्रणा शोधघेत आहेत.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ल्याची धमकी, २६ जानेवारी लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:06 AM