Join us

छत्रपती शिवरायांचे दुर्मीळ सुवर्ण ‘होन’ नाणे पाहण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 4:20 AM

यंदा छायाचित्रण स्पर्धेचे ८ वे वर्ष असून, शनिवार १८ व १९ मे रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मीळ ‘सुवर्ण होन’ नाणे व शिवकालीन शस्त्रे पाहण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांसह शिवप्रेमी व इतिहास अभ्यासकांना मिळणार आहे. ‘शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड’ व ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवशाहीचे साक्षीदार’ ही छायाचित्रण स्पर्धा व प्रदर्शन संकल्पना गेली ७ वर्षे उत्साहात राबवित आहे. यंदा छायाचित्रण स्पर्धेचे ८ वे वर्ष असून, शनिवार १८ व १९ मे रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील प्रसिद्ध दुर्ग छायाचित्रकारांनी टिपलेल्या गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन १८ व १९ मे रोजी सुरू राहणार आहे. आज दुर्गप्रेमींना किल्ल्यांचे एकूण प्रकार किती? ते कुठल्या राजवटीत व कोणत्या कालखंडात निर्मिले गेले याविषयी नेहमीच उत्कंठा राहिली आहे. याचीही माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे पुण्याचे प्रसिद्ध नाणे संग्राहक बस्ती सोलंकी यांनी संग्रहित केलेला शिवछत्रपतींचा दुर्मीळ सुवर्ण होन हा रविवार, १९ मे रोजी दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत सर्व इतिहासप्रेमींना अगदी जवळून पाहण्यासाठी खुला असेल.शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड संस्थेचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा महाराजांनी दोन होन नाणी पाडली होती. एक तांब्याच्या नाण्यांना शिवराई होन असे म्हणतात आणि दुसरी नाणी म्हणजे सुवर्ण होन पाडण्यात आली. या सुवर्ण नाण्याचे वजन साधारण २.६७ ग्रॅम पर्यंत आहे. राज्याभिषेकावेळी महाराजांची तुला झाली. तुला होन ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचे वजन किती आहे, याचा अंदाज आला. त्या वेळी ५२ किलोचे होन तुलामध्ये ठेवण्यात आले. यातील काही होन भारतामध्ये पाच-सहा व्यक्तींकडेच आहेत. त्यातील एक होन आता मुंबईकरांना सावरकर स्मारकामध्ये पाहायला मिळणार आहे.’सुनील कदम, बदलापूर यांचे ऐतिहासिक दुर्मीळ शस्त्रे व शिवराज्याभिषेक समितीची प्राचीन नाणी पाहण्याची सुवर्णसंधी, औरंगाबादचे नाणी संग्राहक व अभ्यासक आशुतोष पाटील यांचे ‘शिवकालीन चलन’ या विषयावर अभ्यासात्मक व्याख्यानाचे आयोजन यानिमित्ताने दुर्ग अभ्यासक व इतिहासप्रेमींसाठी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत करण्यात आले आहे.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज