नगरसेवकांवर गटनेता चव्हाण करणार कारवाई
By admin | Published: July 30, 2014 11:29 PM2014-07-30T23:29:18+5:302014-07-30T23:29:18+5:30
पक्षांतर बंदी कायद्याला झुगारून शिवसेनेत उडी घेणारे ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक यांच्यासह सात नगरसेवकांवर याच कायद्यानुसार आता कायदेशीर कारवाईची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे
जितेंद्र कालेकर, ठाणे
पक्षांतर बंदी कायद्याला झुगारून शिवसेनेत उडी घेणारे ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक यांच्यासह सात नगरसेवकांवर याच कायद्यानुसार आता कायदेशीर कारवाईची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे. नुकतीच ठामपा गटनेते निवड झालेले विक्रांत चव्हाण हे कोकण विभागीय आयुक्तांमार्फत या सातही नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रवींद्र फाटक यांनी मात्र त्यांची पत्नी जयश्री, कांचन चिंदरकर, मनप्रित कौर, राजा गवारी, मीनल संख्ये आणि दीपक वेतकर या सहा नगरसेवकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सात नगरसेवकांच्या जाण्याने आघाडीचे संख्याबळ आता ६५ वरुन ५८ झाले आहे, तर काँग्रेसचे संख्याबळ हे १८ वरून ११ झाले. फाटक यांनी काँग्रेस सोडताच त्यांच्या गटाला मीनल संख्ये यांच्या रूपाने प्रभाग समिती सभापती पदाची बक्षिसीही मिळाली.
पुढे महापौर पदाच्या निवडणुकीतही जयश्री फाटक यांना महापौर करण्यासाठी आता हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. एकीकडे शिवसेनेत बाहेरून आलेल्यांना पाच वर्षे तरी पद देण्यात येऊ नये, अशी मागणी गडकरी रंगायतन येथील निर्धार मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी केली.
अर्थात कार्यकर्त्यांच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत शिवसेनेने फाटक गटाचे शिवसेनेकडून स्वागत होत असले तरी काँग्रेसने मात्र आता त्यांच्यावर येत्या दोन दिवसांत कारवाईचा बडगा उचलण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांनी सांगितले. अर्थात गेलेल्यांपैकी अजूनही कोणी स्वगृही येणार आहे का, याची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती एका ज्येष्ठ नगरसेवकाने दिली. त्यामुळे जे येतील ते वगळता इतरांवर कारवाई करण्यासाठी काँग्रेसकडून आता जोरदार हालचालींना वेग आला आहे. अर्थात तरीही कोणी आले नाहीतर मात्र या सातही जणांवर वरील कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असून, त्याबाबतचा अहवाल प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.