Join us

महागात पडणारे ‘स्वस्त चायनीज’

By admin | Published: May 25, 2014 12:53 AM

ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या पोटाचा आसरा ठरलेल्या वडा-पाव या आवडत्या मेनूची जागा हळुहळू चायनीज खाद्यपदार्थांनी घ्यायला सुरूवात केली आहे.

हितेन नाईक, पालघर - ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या पोटाचा आसरा ठरलेल्या वडा-पाव या आवडत्या मेनूची जागा हळुहळू चायनीज खाद्यपदार्थांनी घ्यायला सुरूवात केली आहे. अत्यंत स्वस्त दरात उदरभरणाची सोय या चायनीज खाद्यपदार्थामुळे होत असली तरी ज्या गलीच्छ व अनारोग्य पसरविणार्‍या वातावरणात या खाद्यपदार्थांची निर्मीती होते त्यामुळे उद्भवणार्‍या आजारामुळे खाणार्‍याना मोठी किंमत मोजावी लागू शकते याची कल्पना खाणार्‍यांना नसावी असे दिसून येत आहे. चायनामेड वस्तू व चायनीज खाद्यपदार्थांना अल्पावधीतच तुफान लोकप्रियता लाभल्याने सध्या ठाणे-मुंबई या शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात नाक्यानाक्यावर दिसणार्‍या वडापावच्या जागेत चायनीजची दुकाने दिसू लागली आहेत. छोटे गाळे, मोडके तोडके मंडपात लाल रंगाने रंगवलेली हातगाडी अथवा टेबल्सच्या बाजुला कळकट-मळकट तुटलेल्या प्लॅस्टीक खुर्च्या, बाजुला अखंड वहाणारी गटारे, अशी अनारोग्य पसरवणारी व्यवस्था सध्या पालघर, शिरगाव, सातपाटी इ. भागातील चायनीज सेंटर परिसरात दिसून येत आहे. यावेळी फ्राईडराईससाठी मोठमोठ्या कढईत भात शिजवून ठेवला जातो. यात सॉस, नुडल्स, भाज्या, भात, चिकन, रंग इ. वस्तुच्या दर्जा विषयी कुठलीही शाश्वती नसल्याचे दिसून येते. तरीही संध्याकाळ झाली की जिभेचे चोचले पुरविण्यासाठी चायनीज सेंटर भोवती गर्दी जमायला सुरूवात होते ती रात्रभर वाढतच जाते. अगदी २०-२५ रुपयात चांगले चमचमीत खायला मिळत असल्याने शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कामगार वर्गाची मोठी गर्दी चायनीज सेंटरकडे वळू लागली आहे.