एसटी स्टँडवर स्वस्त औषधे
By admin | Published: December 28, 2016 02:10 AM2016-12-28T02:10:03+5:302016-12-28T02:10:03+5:30
गरजू रुग्णांना स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने एसटी महामंडळाने राज्यातील सर्व बस स्थानकांवर जेनेरिक औषधांची दुकाने उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला
मुंबई : गरजू रुग्णांना स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने एसटी महामंडळाने राज्यातील सर्व बस स्थानकांवर जेनेरिक औषधांची दुकाने उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि बी.पी.पी.आय. (ब्युरो आॅफ फार्मा पीएसयूएस आॅफ इंडिया) यांच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ही औषधे लवकरच उपलब्ध केली जातील, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
जनतेला स्वस्तात औषधांचा पुरवठा करण्याच्या हेतूने जेनेरिक औषधांच्या विक्रीला केंद्र सरकारने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देशभरात या औषधांची विक्री सुरू झाली. जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांपेक्षा ४0 टक्के कमी दराने विकली जातात. महाराष्ट्रात याचे प्रमाण कमी असून, ती औषधे जास्तीतजास्त गरजूंपर्यंत पोहोचवता यावीत यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेत बस स्थानकांवर उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या वेळी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, बी.पी.पी.आय.चे संचालक निकुंज सारंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
५९७ स्थानकांवर उपलब्ध
- एसटीच्या ५९७ बस स्थानकांवर स्वस्तातील औषधे उपलब्ध केली जातील. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेंतर्गत बस स्थानकांवर जेनेरिक औषधांच्या विक्रीला परवानगी देणारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे देशातील पहिले महामंडळ आहे.