जयसिंगपूर : एकीकडे राज्यात दुष्काळ पडलेला असतानाच राज्यामध्ये दुधाचा महापूर आलेला होता. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा साठा वाढत चाललेला होता व दूध काय करायचे, हा प्रश्न दूध संघांसामेर निर्माण झालेला होता. त्यामुळे खासदार शेट्टी यांनी स्वाभिमानी दूध संघामार्फत ग्राहकांना थेट विक्र ी करून स्वस्त दरात दूध उपलब्ध करून दिले आहे. याचा ग्राहकांना फायदा होणार आहे, असे प्रतिपादन दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले.ठाणे येथे सावता माळी थेट शेतीमाल विक्री अंतर्गत स्वाभिमानी दूध संघ वितरण केंद्राचे उद्घाटन जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जानकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, मुंबईतील ग्राहकांना दूध दराचा फायदा होण्यासाठी स्वाभिमानी दूध संघाने गाय व म्हैस दुधाच्या प्रतिलिटर मागे ५ रुपयांनी विक्रीमध्ये कपात केली आहे. यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, मध्यस्थांची साखळी तोडत ग्राहकांना फायदा होण्यासाठी पाच रुपयांची विक्री दरात कपात केलेली आहे. थेट भाजीपाला विक्री करीत ग्राहकांना फायदा करून दिलेला आहे. त्याच धर्तीवर शहरात दुधाची विक्री केली जात आहे. तसेच लवकरच शहरात धान्य व तांदूळ महोत्सव भरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आमदार संजय केळकर, आमदार विनायक मेटे, डॉ. सुभाष अडदंडे, सावकार मादनाईक, महावीर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)ठाणे येथे स्वाभिमानी दूध संघाकडून पाच रुपये कमी दराने विक्री वितरणाचे उद्घाटन दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार राजू शेट्टी, सावकार मादनाईक, डॉ. सुभाष अडदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईत ‘स्वाभिमानी’चे स्वस्तात दूध
By admin | Published: September 18, 2016 12:26 AM