मुंबई : चोरलेल्या लक्झरी गाड्यांची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करणाऱ्या दुकलीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दिंडोशीपोलिसांनी केली. शाहीद खान (३४), वसीम पठाण (३७) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून ९० लाख रुपयांच्या पाच गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने सोशल मीडियावरील स्वस्त वाहनविक्रीच्या जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन तपासी पथकाने नागरिकांना केले आहे.
दिंडोशीपोलिसांच्या हद्दीत २ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गोकुळधाम येथील ए. के. वैद्य मार्गावर संशयित वाहनाची तपासणी केली जात होती. त्यावेळी दिंडोशी कोर्टासमोरून एक चालक भरधाव वेगात कार पळवत होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तो सुसाट निघून गेला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानेच त्याच्या साथीदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी गाडीची कागदपत्रे तपासली असता बनावट असल्याचे उघड झाले.
कर्नाटकाच्या डीलरची चौकशी :
अटक आरोपींची अधिक चौकशी बनावट नंबर प्लेट व कागदपत्रे असलेली टाटा हॅरिअर कार जप्त करण्यात आली. जी उत्तर प्रदेशच्या नोएडा येथून चोरी केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. तांत्रिक तपासाद्वारे पोलिस कर्नाटकच्या किरणराज नागराज नामक कार डीलरपर्यंत पोहोचले. त्याची दिशाभूल करत या टोळक्याने त्याला बनावट कागदपत्र वापरत तीन चोरीच्या गाड्या विकल्या होत्या. तो तपासात सहकार्य करत असल्याने त्याला अटक केलेली नसून चौकशी सुरू आहे.