दुसऱ्या गावावरून येणे स्वस्त; रिक्षाने घर गाठणे मात्र महाग ! टॅक्सीचालकांकडून जादा भाडे आकारत लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 11:11 AM2023-10-03T11:11:01+5:302023-10-03T11:12:52+5:30
विविध बस, रेल्वेस्थानकासह विमानतळाबाहेर रात्री उशिराने रिक्षा, टॅक्सीचालकांकडून जास्तीचे भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी डोकेवर काढत आहेत.
मुंबई : विविध बस, रेल्वेस्थानकासह विमानतळाबाहेर रात्री उशिराने रिक्षा, टॅक्सीचालकांकडून जास्तीचे भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी डोकेवर काढत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसवर अशाच प्रकारे एका प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकावर टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. मुंबईबाहेरून आलेल्या प्रवाशांना याचा जास्त फटका बसताना दिसतो. बस, रेल्वेच्या तिकिटांपेक्षा हे भाडे जास्त महाग पडतानाचे चित्र काही ठिकाणी पाहावयास मिळते आहे.
काहीशा अंतरासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसवर असलेले काही रिक्षा आणि टॅक्सीचालक प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात भाडे आकारत त्यांची लूट करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही लूट सुरू असताना पोलिस मात्र यामध्ये काहीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची ही लूट वाढतच आहे. परिणामी कुर्ला परिसरात राहणारे मोहम्मद चांद हे त्यांच्या गावी जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसवर आले होते. यावेळी टॅक्सीचालक सतीश सिंह (वय ४०) आणि रिक्षाचालक आशिष सपकाळ (वय २३) यांनी चांद यांच्याकडून जबरदस्तीने सातशे रुपये काढून घेतले. या सर्व घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत, तत्काळ यामध्ये गुन्हा दाखल केला.
काय होते कारवाई?
रिक्षा-टॅक्सी तपासणी करून जादा भाडे, जादा प्रवासी, जलद मीटर, भाडे नाकारणे, उद्धट वर्तन या प्रकरणी कारवाई केली जाते. यामध्ये परवाना निलंबन यासह दंड आकारला जातो.
येथे करा तक्रार
आरटीओ - क्रमांक
ताडदेव - ९०७६२०१०१०
अंधेरी - ९९२०२४०२०२
वडाळा - ९१५२२४०३०३
बोरीवली - ८५९१९४४७४७
नावापुरती कारवाई
अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, कांदिवली, सांताक्रूझ, कुर्ला मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर आदी ठिकाणी रिक्षात पाच पाच प्रवासी बसवले जातात, अशा ठिकाणीही कारवाई होणे गरजेचे आहे.