मुंबई : हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून फसवणूक करण्याचा प्रकार बोरीवलीत शुक्रवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नीरज गुप्ता (३८) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून विविध बँकांचे डझनभर एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत. गुप्ता फसवणूक करण्यासाठी ज्या एटीएममध्ये सुरक्षारक्षक नसतील त्याला तो टार्गेट करायचा. त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी एटीएमबाबत अशिक्षित लोकांना गाठायचा.
त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करत असल्याचे सांगत त्याच्या एटीएम कार्डचा पिन क्रमांक जाणून घ्यायचा. त्यानंतर बोलण्यात अडकवून त्यांचे मूळ एटीएम कार्ड हातचलाखीने ताब्यात घ्यायचा. बऱ्याचदा पैसे काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवत कार्डमध्ये समस्या असल्याचे सांगत मूळ कार्ड घेऊन तिथून पोबारा करायचा. त्यानंतर त्याच कार्डचा पिन क्रमांक वापरून त्यातून पैसे काढायचा.या प्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तो मीरा रोडचा राहणारा असून त्याच्यावर कस्तुरबा पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे अद्याप तीन गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार पोलीस त्याची चौकशी करत आहेत.