टेक्सटाइल मंत्रालयातील सदस्याला व्हीआयपी मोबाईल नंबर पडला दीड लाखांना, महाठग गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 11:55 PM2018-09-08T23:55:53+5:302018-09-09T00:03:23+5:30
व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याचे आमिष दाखवत केंद्र शासनाच्या टेक्स्टाईल मंत्रालयातील सदस्य आणि इस्कॉन मंदिराचे मुख्यव्यवस्थापक लकमेंद्र खुराणा (60) यांना दीड लाखांना गंडा घालणार्या महाठगाला आंबोली पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे.
मनीषा म्हात्रे
मुंबई : व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याचे आमिष दाखवत केंद्र शासनाच्या टेक्स्टाईल मंत्रालयातील सदस्य आणि इस्कॉन मंदिराचे मुख्यव्यवस्थापक लकमेंद्र खुराणा (60) यांना दीड लाखांना गंडा घालणार्या महाठगाला आंबोली पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. सुरेशकुमार भवरलाल गेलोचा (52) असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला गोव्यातील एका लॉजवरून बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेलोचा याने खुराणा यांना फोन करून व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याचे आमिष दाखविले. खुराणा यांनी त्याला 9099999999 हा मोबाईल क्रमांक देण्याची मागणी केली. या मोबाईल नंबरसाठी तब्बल 1 लाख 51 हजार रुपये भरावे लागतील, असे गेलोचा याने त्यांना सांगितले. खुराणा यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत पैसेसुद्धा भरले. मात्र पैसे हातात पडताच गेलोचा फोन बंद करून बेपत्ता झाला. अखेर खुराणा यांनी आंबोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत गेलोचा विरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आंबोली पोलीस ठाण्याचे वपोनि भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रवींद्र कळमकर यांच्या पथकाने गेलोचा याचा शोध सुरू केला. गेलोचा हा दिल्ली, डेहराडून, जळगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता. तो नेहमी आपली ठिकाणे बदलायचा. अखेर त्याच्या जीवनशैलीचा अभ्यास करत तो गोव्यामधील एका लॉजमध्ये येत असल्याची माहिती मिळविली आणि पणजीमधील किस्मत लॉजवर छापा टाकून त्याला जेरबंद केले आहे. आरोपीकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.