मुंबई : जपानमध्ये जाणारी सहल कोरोनामुळे रद्द झाली. मात्र, टुर्स कंपनीने घेतलेली रक्कम परत न केल्याचा प्रकार गोरेगावमध्ये समोर आला आहे.
ताडदेवमध्ये राहत असलेल्या ६८ वर्षीय आजोबांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वनराई पोलीस तपास करत आहेत.
.........................
व्यापाऱ्याला दिली ठार मारण्याची धमकी
मुंबई : व्यवसायासाठी मदत म्हणून दिलेले पैसे परत न करता उडवाउडवीची उत्तरे देत, शिवीगाळ करून व्यापाऱ्याला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. यात व्यावसायिकेने सव्वा कोटी रुपये दिले होते.
....
नाकाबंदी सुरू असल्याचे सांगून लूट
मुंबई : नाकाबंदी सुरू असल्याचे सांगून ठगांनी पोलीस असल्याची बतावणी करत ५० वर्षीय महिलेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला. यात महिलेच्या ४७ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांवर ठगांनी हात साफ केला.
.....
बोलण्यात गुंतवून वृद्धाला गंडा
मुंबई : घाटकोपर परिसरात राहणाऱ्या ६८ वर्षीय वृद्धाला बोलण्यात गुंतवून ३५ हजार किमतीच्या दागिन्यांची फसवणूक केली आहे. घाटकोपरमध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.....
तरुणावर हल्ला; गुन्हा दाखल
मुंबई : सायन सर्कल परिसरातून नितीन सरोज (वय २२) हे मित्राला मानखुर्द येथे सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना, त्रिकुटाने त्यांची दुचाकी समोर उभी केली. याबाबत विचारणा करताच, त्रिकुटाने त्यांच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. यात दोघेही जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सायन पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला.
....