मुंबई : शासकीय भूखंडावर घर मिळवून देण्याच्या नावाखाली परेलच्या महात्मा गांधी मेमोरिअल रुग्णालयाच्या ३० परिचारिकांना ८८ लाखांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे येथीलच नर्सेस प्रशिक्षण विभागाच्या प्रिन्सिपल अलका सखळ यांच्या मध्यस्थीने पोलीस महिलेच्या पतीने ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. बुधवारी या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परळच्याच ईश्वर तायडेने २०१५ मध्ये परिचारिका विभागाच्या अलका सखळ यांच्याशी ओळख केली. तायडे हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याची पत्नी रेल्वे पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी आमदारकीसाठीही तो निवडणुकीच्या रिंगणात होता. याचदरम्यान तायडेने सखळ यांना परिचारिकांसाठी शासकीय भूखंड मिळवून त्यावर स्वस्तात घरे उभारण्याचे आमिष दाखवले.त्याबाबत त्याने शासनाकडे केलेला पत्रव्यवहारही दाखवला. त्यामुळे सखळ यांनी हा प्रस्ताव रुग्णालयाच्या परिचारिकांपुढे मांडला. हक्काचे घर होणार म्हणून त्यांनीही प्रत्येकी ३ लाख रुपये दिले. अशा प्रकारे ३० हून अधिक परिचारिकांनी यात गुंतवणूक केली. वेळोवेळी सखळ यांच्या उपस्थितीतच तायडेसोबत बैठका झाल्या.तायडेने फेब्रुवारी २०१७ पर्यंत त्यांना घराचा ताबा देण्याचे आमिष दाखवले. त्याबाबतच्या करारपत्रावर सखळ आणि तायडेने सह्या केल्या. त्यामुळे परिचारिकांचा आणखी विश्वास बसला. मात्र, काहींना संशय आल्याने त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. तेव्हा तायडेने त्यांना धनादेश दिले. मात्र तेही बाऊन्स झाल्याने त्यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तायडे आणि सखळ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.तायडे सध्या पसार आहे. त्याच्या घरीही पोलिसांनी धाव घेतली. तेव्हा त्याच्या पत्नीने तायडेसोबत राहत नसल्याचे सांगितले, तर सखळ यांनी तायडेने आपलीही फसवणूक केल्याचा दावा केला आहे. तायडेचा शोध सुरू असून लवकरच त्याला बेड्या ठोकण्यात येणार असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांनी दिली.
कामगार रुग्णालयातील ३० परिचारिकांना गंडा, शासकीय भूखंडावर घर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:47 AM