नोकरीच्या नावाखाली फसवणूक
By admin | Published: August 10, 2015 01:42 AM2015-08-10T01:42:27+5:302015-08-10T01:42:27+5:30
आखाती देशातील पेप्सी, अलबरारीसह गल्फ टॅलेंटसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ७०० जणांना गंडा घालणाऱ्या दुकलीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला
मुंबई : आखाती देशातील पेप्सी, अलबरारीसह गल्फ टॅलेंटसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ७०० जणांना गंडा घालणाऱ्या दुकलीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मोहम्मद साजिद मोहम्मद हनिफ खान आणि नफिज अहमद युनूस अन्सारी अशी आरोपींची नावे आहेत. मुंबई, नवी मुंबई परिसरातून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
यासंदर्भातील तक्रार नागपाडा येथील एकाने केली. डिसेंबर २०१४च्या दरम्यान या दुकलीने तक्रारदाराशी संपर्क साधून गल्फ देशातील नामांकित तीन कंपन्यांमध्ये कामगारांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
पेप्सी, अलबरारीसह गल्फ टॅलेंटसारख्या कंपन्यांच्या बनावट डिमांड लेटरची प्रत व्हॉट्सअॅप करून तक्रारदार यांचा विश्वास संपादन करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. ठरल्याप्रमाणे खान आणि अन्सारीने त्यांच्याकडून अर्जदारांची नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे, पासपोर्टसहित ठरावीक रक्कम देण्यास सांगितले.
अशा प्रकारे जवळपास ७०० अर्जदारांपैकी ४०० उमेदवारांची निवड करत आरोपींनी ३०० जणांचे पासपोर्ट आणि कागदपत्रे पाठविली होती. तर परदेशातील विविध कंपन्यांचे बनावट व्हिसा, पासपोर्ट आणि विमान तिकिटे बनवून तक्रारदारास पाठविली; मात्र प्रत्यक्षात कुणालाही नोकरीसाठी पाठविण्यात आले नाही. यात जवळपास ४० लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक करत खान आणि अन्सारी पसार झाले. त्यात आरोपीने दिलेली कागदपत्रेही बनावट असल्याचे निदर्शनास येताच तक्रारदार यांनी १५ जुलै रोजी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्यांचा गुन्हे प्रकटीकरण शाखा ३चे वरिष्ठ निरीक्षक अरविंद सावंत यांचे तपास पथक समांतर तपास करत होते.
खान आणि अन्सारी दोघेही मुंबई, नवी मुंबई परिसरात भाड्याने घर आणि कार्यालय घेऊन वारंवार बदलत होते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर आव्हान होते. अखेर गुप्त माहितीदारांमार्फत खान आणि अन्सारीला वाशी आणि गोवंडी परिसरातून बुधवारी पकडण्यात आले. (प्रतिनिधी)