मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे धार्मिक वाहिनी सुरू करण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची साडेपाच कोटींना फसवणूक झाल्याचे अंबोली परिसरात उघड झाले आहे. या प्रकरणी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. अमित आणि हिमाक्षी सिन्हा असे दाम्पत्याचे नाव आहे.सिन्हा दाम्पत्याने ते अमेझिंग इंडिया टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असल्याचे सांगितले. तक्रारदार व्यावसायिक प्रसन्ना प्रभू यांची यामध्ये फसवणूक झाली आहे. २०१५ मध्ये त्यांची सिन्हा दाम्पत्यासोबत ओळख झाली. त्यांनी आनंदम नावे धार्मिक वाहिनी सुरू करण्याबाबत प्रभू यांना सांगितले. पुढे त्यांच्याकडील कोट्यवधीच्या व्यवहारांची बनावट कागदपत्रेदेखील दाखवली. त्यामुळे प्रभू यांचा त्यांच्यावर विश्वास बसला.धार्मिक वाहिनीच्या गुंतवणुकीत नफा होण्याच्या आमिषाने त्यांनी साडेपाच कोटींची गुंतवणूक केली. मात्र बरेच दिवस उलटूनही वाहिनी सुरू होत नसल्याने, प्रभू यांना संशय आला. त्यांनी याबाबत सिन्हा दाम्पत्याकडे विचारणा करताच, ते टाळाटाळ करू लागले. अखेर, यात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच प्रभू यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून सुरुवातीला अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. या दाम्पत्याने आणखीन काही व्यावसायिकांना गंडविल्याचा संशयही वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, गुन्हे शाखा सर्व बाजूंनी तपास करत आहे.
धार्मिक वाहिनी सुरू करण्याच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 6:14 AM