जुन्या कार विक्रीच्या नावाखाली फसवणूक

By admin | Published: October 7, 2015 04:33 AM2015-10-07T04:33:18+5:302015-10-07T04:33:18+5:30

ओएलएक्ससारख्या सोशल नेटवर्किंग साइटवरून जुन्या कार विक्रीच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालणाऱ्या ठगाला गुन्हे शाखेच्या कक्ष एकने गजाआड केले आहे.

Cheating in the name of old car sales | जुन्या कार विक्रीच्या नावाखाली फसवणूक

जुन्या कार विक्रीच्या नावाखाली फसवणूक

Next

मुंबई : ओएलएक्ससारख्या सोशल नेटवर्किंग साइटवरून जुन्या कार विक्रीच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालणाऱ्या ठगाला गुन्हे शाखेच्या कक्ष एकने गजाआड केले आहे. सकपालसिंग वालिया (३४) असे आरोपी ठगाचे नाव असून क्रॉफर्ड मार्केट परिसरातून त्याला अटक करण्यात आली.
मूळचा नवी मुंबई येथील कोपरखैरणे परिसरात राहणारा वालिया कार डीलर म्हणून काम करतो. दोन महिन्यांपूर्वी मुलुंडमध्ये राहणाऱ्या जिगर ठक्कर नावाच्या तरुणाला कमी किमतीत स्विफ्ट कार मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले. अवघ्या १ लाख ४२ हजारांमध्ये स्विफ्ट कार मिळत असल्याने ठक्करने ठरल्याप्रमाणे पैसे दिले. पैसे देऊनही कारची डिलिव्हरी करण्यास वालियाने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी वालियाने संपर्क तोडल्याने यामध्ये फसवणूक झाल्याचे ठक्करच्या लक्षात आले. त्याने मुलुंड पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन मुलुंड पोलीस याचा शोध घेत होते.
गुन्हे शाखेच्या कक्ष एकने मंगळवारी वालियाच्या मुसक्या आवळल्या. ओएलएक्ससारख्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर जुन्या कार कमी किंमतीत देण्याचे अमीष दाखवून वालिया लोकांची फसवणूक करत असे. गाडी पसंद करणाऱ्या ग्राहकांचा विश्वास संपादन करुन तो त्यांच्याकडून पैसे उकळायचा. पैसे हातात आल्यानंतर संबंधित व्यक्तीशी संपर्क तोडून पसार होत असल्याचे तपासात समोर येत आहे. अशाप्रकारे त्याने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस वालियाकडे अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

विश्वास संपादन करून ग्राहकांची फसवणूक
आरोपी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर जुन्या कार कमी किंमतीत देण्याचे अमीष दाखवून लोकांची फसवणूक करत असे. ग्राहकांचा विश्वास संपादन करुन तो त्यांच्याकडून पैसे उकळायचा. पैसे हातात आल्यानंतर संबंधित व्यक्तीशी संपर्क तोडून पसार होत असल्याचे तपासात समोर येत आहे. त्याने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Cheating in the name of old car sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.