Join us

‘राइस पुलर’च्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 2:37 AM

तिघांना अटक : गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई : ‘राइस पुलर’ ही दुर्मीळ वस्तू विकण्याच्या नावाने अब्जावधी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या तिघांना मंगळवारी अटक करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ११ने ही कारवाई केली. योगेश प्रजापती (५८), सय्यद राईजादा (५१) आणि प्रग्नेश दावडा उर्फ ठक्कर (४१) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ते बोरीवली आणि सायन परिसरात राहणारे आहेत.

अव्हेन्यू अँटिक इंटरनॅशनल, एवोन मेटल आॅर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल व्हीनस मेटल या नावाच्या कंपनीच्या मालकांनी फसवणूक केल्याची तक्रार गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे केली होती. पुरातन वस्तुंची खरेदी करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची विक्री करणे, तसेच या वस्तूचे परीक्षण करण्याचे काम करत असल्याचे तीन आरोपींनी फिर्यादींना सांगितले. कोलकात्यामध्ये एका व्यक्तीकडे राइस पुलर ही दुर्मीळ वस्तू असून, त्याच्या परीक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे जर परीक्षणासाठी लागणारी करोडो रुपयांची गुंतवणूक तुम्ही केली, तर अब्जो रुपयांचा आपल्याला फायदा होईल, असे आमिष त्यांनी दाखविले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तक्रारदारांनी एक कोटी ५४ लाख रुपये त्यांना दिले. मात्र, त्यानंतर त्यांना वेगवेगळी कारणे सांगत त्यांची फसवणूक केली.

या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कॉर्डिनेटर म्हणून काम करणाºया ठक्करला आधी ताब्यात घेण्यात आले. श्रीमंत लोकांना हेरून त्यांना राइस पुलरबाबत सांगून विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांची फसवणूक करायची, अशी त्यांची कार्यपद्धती असल्याचे त्याने कबूल केले. त्यानुसार, कक्ष ११चे प्रमुख चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई करत आरोपींना गजाआड केले.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी