‘दानी-दाना’कडून कोट्यवधींची फसवणूक; चिनी मालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 08:46 AM2023-11-04T08:46:20+5:302023-11-04T08:46:48+5:30
चिनी मालक गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन फरार; ॲप ईडीच्या रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑनलाईन गेम खेळा आणि भरघोस रकमेची बक्षिसे जिंका, असे आमिष दाखवत हजारो लोकांना गंडा घालणारे दानी-दाना ॲप सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले असून, या कंपनीचा मालक चिनी असल्याचे तपासात आढळून आले आहे. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने गुजरातमध्ये ११ ठिकाणी छापेमारी केली आहे. देशभरात या ॲपशी हजारो लोक जोडले गेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, एका चिनी नागरिकाने गुजरातमधील काही व्यावसायिकांना हाताशी धरून डिसेंबर २०२१ मध्ये दानी-दाना हे ॲप बाजारात आणले होते. या ॲपद्वारे लोकांना विविध प्रकारचे गेम्स खेळण्याची सुविधा होती. याकरिता या ॲपच्या वॉलेटमध्ये काही पैसे शुल्कापोटी भरावे लागत होते.
सुरुवातीच्या काळात जे लोक खेळले व जिंकले त्यांना त्यांच्या एकूण पैशांवर पाऊण टक्के अधिक दराने बक्षीस देण्यात आले.
मात्र, जून २०२२ मध्ये हे ॲप गूगल प्लेवरून गायब झाले. तर, ज्यांनी हे ॲप डाऊनलोड केले होते तेदेखील चालणे बंद झाले होते. यामुळे हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये गायब झाले.
या प्रकरणी सर्वप्रथम गुजरातमधील पालनपूर येथे सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या घोटाळ्याची व्याप्ती देशभरात असल्यामुळे या तपासाची सूत्रे होती घेतली. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारी दरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाती लागली आहेत. त्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.